पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघाताच्या (Pune Porsche Car Accident) दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यानंतर सुनील टिंगरेंकडे देखील संशयानं पाहिलं जात आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Sunil Tingre) यांनी आज माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरेंची बाजू मांडली.
स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे शंकेने बघितले जातंय, असं पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, चौकशी करु द्या ना, मी पण बारामतीचा 32 वर्षांपासून आमदार आहे. आम्ही कामामुळे मुंबईत असतो, कधी पुण्यात असतो. मी मतदार संघात नसतो. जे आमदार असतात, ते बहुतेक त्यांच्या मतदारसंघात असतात. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास त्यांना संबंधित ठिकाणी जावं लागतं. एकदा सुनील टिंगरेंच्या मतदासंघात स्लॅब कोसळला होता. त्यावेळीही ते मदतीला धाऊन गेले होते. तसेच या घटनेत निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यामुळे सुनील टिंगरे त्या ठिकाणी गेला आणि दोषींवर कारवाई करण्यास सांगितले होते, अशी जूनी आठवण सांगत अजित पवारांनी सुनील टिंगरेंची बाजू मांडली.
लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या ते करतात. ज्यावेळेस आपल्या पुण्यात पूर येतो, एखादी घटना घडते तेव्हा स्थानिक आमदार उपस्थित असतात, घटनास्थळी जातात आणि मदत करण्याच्या प्रयत्न करतात. जे कोणी दोषी असतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचं ते सांगतात, असं अजित पवार म्हणाले. सदर अपघात रात्री उशीरा घडली. रात्री उशीरा सुनील टिंगरेंना फोन आला. आता फोन कोणाचा आला हे त्यांनी सांगितलं आहे. मग सुनील टिंगरे पोलीस स्टेशनला गेले होते. सुनील टिंगरेंनी कोणालाही पाठिशी घाला, असं सांगितलं नाही, असं अजित पवारांनी सांगितले. पोलीसांनी योग्य ती कारवाई करत असल्याचं अजित पवार म्हणाले.
अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक-
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना क्राइम ब्रांचने ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आता अल्पवयीन मुलगा आणि आई शिवानी अग्रवाल यांची एकत्रित चौकशी करणार आहेत. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल.