मुंबई:गेल्या पाच वर्षात पिंपरीची अवस्था काय करून ठेवलीय हे जनतेसमोर आहे. पिंपरीतील भाजपचे स्थानिक नेते 40 हजार कोटींचा विकास केल्याचं सांगत आहेत, पण त्याचं कामं कुठे केली? तो पैसा कुठे गेला? याचा जाब विचारायला नको का? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते इतर कामात व्यस्त असतील, पण मी पालकमंत्री आहे, माझं लक्ष असणार असा इशाराही त्यांनी दिला. अजित पवार पिंपरीमध्ये प्रचार सभेत बोलत होते.

अनेक जण आले गेले, मला काही फरक पडत नाही. जो पर्यंत माझ्या मागे माय-माऊली असेल तोपर्यंत मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही असं अजित पवार म्हणाले. काकांच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललंय, गळ्या शपथ सांगतो, अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली.

मी पिंपरी चिंचवडचा विकास केला, पण कधी कर्ज काढलं नाही. आता पालिका कर्जबाजारी झाली आहे. यांनी 40 हजार कोटींची कामं कुठे केली आणि त्याचा पैसा कुठे खर्च झाला याची माहिती लोकांना द्यावी असं अजित पवार म्हणाले.

शहरात कुणाची दादागिरी चालतेय?

मी महेश लांडगे यांना स्थायी समितीचा अध्यक्ष केला. यातून त्याने जे करायचं ते केलं. मग विधानसभेला आपल्याच विलास लांडेयांच्या विरोधात बंडखोरी केली. त्यानंतर शहरात काय-काय होतंय, हे तुम्ही पाहताय. आज दादागिरी कोणाची चालली? भ्रष्टाचार कोण करतंय? त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ इतर कामात बिझी आहेत, त्यामुळं त्यांचं याकडे लक्ष नसेलही. पण मी पालकमंत्री आहे. आपण लक्ष ठेऊन आहोत.

अजित पवार म्हणाले की, "संक्रातीच्या आदल्या दिवशी प्रचार थांबतोय. मग तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला. मग भोगीला मतदान आहे. आता अनेक प्रलोभनं दाखवले जातील. भूल थापांना बळी पडू नका. कोण काय करत असेल तर, कोणाला जास्त झालं असेल तर त्यांच्याकडून घ्या, काय सोडू नका. पण मी काय घ्या, हे म्हणालो नाही. तुमच्या बुद्धीला स्मरून काय करायचं ते करा, पण घड्याळाचे बटन दाबा."

आमच्यासोबत राहायचं असेल तर सावरकरांचे विचार स्वीकारावे लागतील असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले होते. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. शिव-शाहू फुलेंची विचारधारा घेऊन पुढं निघालोय, मी त्यांच्या पुढं नतमस्तक आहे असं अजित पवार म्हणाले.

पिंपरीत भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने

राज्यात सत्तेत एकत्र असलेले हे दोन पक्ष आगामी महानगर पालिकेत मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत. पुणे आणि पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरुन या दोघांमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा रंगलाय. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतोय. त्यामुळे आरोपांना चांगलीच धार आल्याचं दिसतंय.

भाजपच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली, तसंच शहरात लुटारुंची टोळी दिवसाढवळ्या वावरतीय अशा विखारी शब्दात अजित पवारांनी भाजपला थेट लक्ष्य केलं होतं. तर याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांचं कौतुक करताना पवारांनी विकासकामं केल्याची पुष्टीही जोडली होती.

अजित पवारांनी भाजपचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यानं संतापलेल्या भाजपनं त्यांच्यावर तोफ डागली. अजित पवारांना सोबत घेताना आपण फडणवीसांना आधीच सावध केलं होतं अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी तोंडसुख घेतलंय.

ही बातमी वाचा: