पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामती (Baramati) येथे तुफान गर्दी झाली होती. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते बारामतीत आले होते. हजारोंच्या डोळ्यात अश्रू होते, मनात अतीव दु:खाच्या वेदना होत्या. मात्र, या दु:खद प्रसंगातही काहींना संधी साधावी वाटली. म्हणूनच, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे हीच उपमा यांच्यासाठी सार्थकी ठरू शकते. अंत्यसंस्कारावेळीच्या गर्दीचा गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना गर्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे 20 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा तक्रारदारांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी रणजीत बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजीत मधुकर भोंगळे व इतर यांच्या सोन्याच्या चैन, रोख रक्कम असा अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांकडून 7 जणांना अटक
बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान राजकुमार बाबुराव आठवले (रा.तलवाडा ता.गेवराई, जि. बीड), मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस (रा. गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), एजाज भगु मीरावले (रा.गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (रा. मोतीनगर, डिग्रज, यवतमाळ), बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (रा. इंदिरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर सध्या रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), तुषार कैलास मासाळ (रा.कोरडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), नितीन अंकुश गायकवाड (रा.शिक्षक कॉलनी, ता. बीड,जि.बीड) आदी आरोपींना अटक आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी अधिक पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.
