पुणे : आर आर आबांच्या पश्चात अजितदादाच आमचे आधारवड होते, आमच्या कुटुबीयांच्या मागे उभे होते. यापुढे वडीलधारी व्यक्ती म्हणून दादांचे मार्गदर्शन कधीही लाभणार नाही अशा भावना दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील (Smita R R Patil) यांनी व्यक्त केल्या. आबा गेल्यानंतर रोहित आणि आपल्या पालकत्वाची जबाबदारी अजितदादांनी स्वीकारली अन् ती शेवटपर्यंत निभावली. आता दादा नसणं हे दुःख पचवणं आमच्यासाठी कठीण असल्याचं सांगत स्मिता पाटील यांचा कंठ दाटून आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवरच नव्हे तर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या कुटुंबीयांवरही तसाच प्रसंग ओढावल्याचं स्मिता पाटील म्हणाल्या.
Smita R R Patil On Ajit Pawar : दादा नाहीत हे दुःख पचवणं कठीण
एबीपी माझाशी बोलताना स्मिता पाटील म्हणाल्या की, "अजितदादा गेले अन् आर आर आबांच्या कुटुंबात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली. आबांच्या पश्चात अजितदादा हे आर आर पाटील कुटुंबीयांचे आधारवड होते. पण आता यापुढे वडीलधारी म्हणून अजितदादांचं मार्गदर्शन लाभणार नाही. हे दुःख पचवणं आमच्यासाठी खूप कठीण आहे. असं दुःख पुन्हा आमच्या वाट्याला येईल, असा स्वप्नात ही विचार केला नव्हता. आता भविष्यात आम्हाला अजितदादांची पदोपदी उणीव भासेल."
अजितदादांच्या आठवणी सांगताना स्मिता पाटील यांचा कंठ दाटून आला. आर आर आबांच्या पश्चात त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि कन्या स्मिता पाटीलच्या पालकत्वाची जबाबदारी अजितदादांनी स्वीकारली अन् हयात असेपर्यंत ती त्यांनी निभावली. रोहित पाटलांच्या राजकीय जीवनात तर स्मिता पाटलांच्या शैक्षणिक ते वैवाहिक आयुष्याच्या निर्णयातही अजित दादांनी पुढाकार घेतला आणि आबांच्या पश्चात जी पोकळी निर्माण झाली ती भरुन काढली. आपल्या लग्नाची सगळी जबाबदारी अजितदादांनी घेतली आणि ती पार पाडली, त्यांनी कधीही वडिलांची कमी भासू दिली नाही असं स्मिता पाटील म्हणाल्या.
Smita Patil Pune : यापुढे वडीलकीचे मार्गदर्शन मिळणार नाही
आता अजितदादाही सोडून गेलेत, त्यामुळे वडीलकीचे मार्गदर्शन आणि आपुलकी यापुढं मिळणार नाही असं स्मिता पाटील म्हणाल्या. दादा आपल्याला सोडून गेलेत हे अजूनही मनाला पटत नाही अशा शब्दात स्मिता पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आधी आबा आणि आता वडीलधारी अजितदादा गेल्यानं पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाल्याचं सांगताना स्मिता पाटील यांचे डोळे भरुन आले.
ही बातमी वाचा: