पुणे: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवार गटासाठी खूप मोठा झटका मानला जात आहे. सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये विजय झाल्याने अजितदादा गटाची (Ajit Pawar Camp) अब्रू जाण्यापासून वाचली असली तरी विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकते, याचा अंदाज राजकीय वर्तुळाला आहे. त्यामुळे सध्या अजितदादा गटात अस्वस्थतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे. रोहित पवार (Rohit Pawar) हे सातत्याने अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. 


अशातच आता अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून अजितदादांना हादरे बसायला सुरुवात झाली आहे. कारण, पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेदेखील शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे अजितदादा गटात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांची भेट घेतलेल्या 8 नगरसेवकांची नावं समोर आली आहेत. 




शरद पवारांना भेटलेले अजित पवार गटातील 8 माजी नगरसेवक कोण?


1) अजित गव्हाणे - शहराध्यक्ष, अजित पवार गट
2) विक्रांत लांडे - माजी नगरसेवक ( माजी आमदार विलास लांडेंचे पुत्र)
3) पंकज भालेकर - माजी नगरसेवक
4) समीर मासुळकर - माजी नगरसेवक
5) संजय वाबळे - माजी नगरसेवक
6) राहुल भोसले - माजी नगरसेवक
7) विनया तापकीर - माजी नगरसेविका
8) वैशाली घोडेकर - माजी नगरसेविका


अजितदादांना सांगून ते 8 नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला


शरद पवारांना भेटण्यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अजित पवारांना भेटले होते. महायुतीत एक बेसिक फॉर्म्युला ठरलाय, ज्यांचे विद्यमान आमदार असतील ती विधानसभा त्याच पक्षाच्या वाट्याला येणार. त्यानुसार भोसरी विधानसभा ही भाजपला सुटणार आहे, हे उघड आहे. अजित पवारांच्या गटाकडून शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे स्वतः इच्छूक आहेत. 


अजित गव्हाणेंनी लढण्यास असमर्थता दर्शवल्यास माजी आमदार विलास लांडे लढण्याच्या तयारीत आहेत. हे पाहता आमचं काय होणार? आम्हाला विधानसभा लढायची आहे? मग आम्ही कोणत्या चिन्हावर लढायची? असे प्रश्न अजित पवारांसमोर भोसरी विधानसभेतील शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. साहजिकच या प्रश्नांची उत्तरं अजित पवारांकडे नव्हती. हे पाहून आम्ही शरद पवारांना भेटायला जातोय, असा निरोप देऊन हे सगळे त्याचदिवशी म्हणजे काल संध्याकाळी शरद पवारांना भेटायला गेले. आपण शरद पवारांना भेटलोय, याची कुणकुण अजित पवारांना कुठून ना कुठून लागणार, याची संबंधित नगरसेवकांना खात्री होती. त्यापासून अजित पवार याबाबत अनभिज्ञ नसावेत, म्हणून या सर्वांनी अजित पवारांच्या कानावर ही बाब टाकल्याचे यातील एका माजी नगरसेवकाने सांगितले.


आणखी वाचा


अजितदादांचे आमदार परतीच्या वाटेवर? आमदारांवर बारीक लक्ष, पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करणार; अजित पवार गटाचा इशारा