पुणे : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार उद्या (25 सप्टेंबर) पहिल्यांदाच (Pimpri chinchwad) पिंपरी चिंचवड (Ajit Pawar) या एकेकाळच्या त्यांच्या बालेकिल्ल्यात येत आहेत. त्यामुळं शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला आहे.अजित पवारांना मानणारा पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वर्ग आहे. अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबादेखील आहे. त्यामुळे आता सत्तांतरानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


कसा असेल दिनक्रम?


मुंबईवरून ते सकाळी 9 वाजता पिंपरी चिंचवडचं प्रवेशद्वार म्हणजे मुकाई चौकात पोहचतील. तिथून ते महापालिका दरम्यान त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जाईल. मग सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 दरम्यान पालिकेत आढावा बैठक घेतली जाईल. महायुतीतील उपमुख्यमंत्री येतायेय म्हटल्यावर भाजपचे आमदार आणि स्थानिक पदाधिकारी या बैठकीला येतात का? हे पाहणं ही औत्सुक्याचे असेल. कारण सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात असणारी पालिका भाजपनं काबीज केली आहे. त्यानंतर गेली साडे सहा वर्षे इथं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता परिस्थिती या उलट आहे. बदललेली ही परिस्थिती स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांकडून स्वीकारली जाणार का? हे उद्या पालिकेत अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होईल. बैठक संपली की दुपारी दीड वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर अजित पवार नेहमीच भाजपवर सडकून टीका करायचे पण आता या मेळाव्यात ते कोणावर आणि काय भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असेल.


सध्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा सभेत अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक करताना दिसतात. सत्तेत सामील होण्यापूर्वी अजित पवार पिंपरीतच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणी बोलताना ते भाजपवर सडकून टीका करायचे. त्यांच्या धोरणांना विरोध करायचे. भष्ट्राचार, गुन्हेगारी आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारा आणि त्यावर तोडगा काढा, असं त्यांचं मत होतं. मात्र सत्तेत सामील झाल्यापासून ते थेट मोदींच्य़ा कामाचं कौतुक करताना दिसत आहेत. शिवाय विकासासाठी एकत्र आल्याचं ते आवर्जून बोलताना दिसतात. त्यामुळे महापालिकेत आल्यावर ते नेमकं काय बोलतील आणि त्यांनी नेमकी भूमिका काय असेल?, हे पाहणं ममहत्वाचं असणार आहे.