Aditya Thackeray In Talegaon : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)  हे सतत दिल्लीचा दौरा करत आहेत. मात्र मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीत जात आहेत. ते महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत जात नाहीत, असा हल्लाबोल शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी केला आहे. ते पुण्यातील तळेगावमधील जनआक्रोश आंदोलनात बोलत होते. फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगावात होणार होता. मात्र तो प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज तळेगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. 


महाराष्ट्रातील  महत्वाचे प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात गेले मात्र त्यातील एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. त्यात  फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील महाराष्ट्राबाहेर गेले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मोठा उपलब्ध होणार होता.  परंतु, या सरकारने तरुणांच्या तोंडातील घास हिरावून घेतला, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. 


'ज्यांनी कोरोनाच्या काळात देखील राजकारण केलं ते विरोधक आता आम्हाला राजकारण करु नका असं म्हणतात. आम्ही तरुणांच्या प्रश्नांसाठी लढत आहोत. परंतु, रोजगाराबाबत बोलणं, त्याबाबत प्रश्न उपस्थित करणं याला  जर विरोधक राजकारण म्हणत असतील तर आम्ही राजकारण करत आहोत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.   


आदित्य ठाकरे म्हणाले,  'देशाच्या उज्वल भविष्यासाठी महत्वाचा भाग असलेल्या तरुणांसाठी, जेष्ठांसाठी काही करण्याची इच्छा व्यक्त केली किंवा त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात वक्तव्य केलं तर आम्ही राजकारण करत आहोत, असं विरोधक हल्लाबोल करतात. केंद्र सरकार हेच असताना आम्ही महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली. धोकेबाज, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार आल्यावरच  मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरूणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेला. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत.