Pune Accident : पुण्यात अपघाताचं (Pune Accident ) सत्र संपायचं नाव घेत नाही आहे.  मुंबई-बंगळुरु महामार्गावरील पुनावळेजवळ सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि माल वाहून नेणाऱ्या टेम्पोची धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघांना रावेत येथील खाजगी रुग्णालयात (Pune)  दाखल करण्यात आले आहे. 


एमएच 14, जेएल 1588 क्रमांकाचा लहान टेम्पो वाकडकडून कामशेतला निघाला होता. टेम्पोमध्ये मंडप डेकोरेशनचे साहित्य होतं. टेम्पोत चलाकासह तिघं बसले होते. पुनावळे परिसरात ट्रकने अचानक बाजू बदलली होती. त्यामुळे ट्रकचा ताबा सुटला आणि ट्रक टेम्पोला जाऊन धडकला. या सगळ्यात मागून भरधाव वेगाने येत असलेली कारही धकडली. यात तिघेही ट्रकच्या केबिनमध्ये अडकले होते. पोलिसांच्या मदतीने तिघांना बाहेर काढलं आहे. शहरात सगळीकडे दिवाळीमुळे उत्साहाचं वातावरण आहे. त्यात पुणे शहरात सकाळीच दोन घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 


अपघाताचं सत्र संपणार तरी कधी?
काही दिवसांपूर्वी  पुण्यातील एमआयटीमध्ये (MIT) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण (pune accident) अपघात झाला होता. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला होता. पाच जण गंभीर जखमी झाले होते. एक्सयूव्ही 300 गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या असलेल्या दुकानाला धडकली आणि गाडी पलटी होऊन दोघांनी जागीच प्राण सोडले होते. रचित मेहता आणि गौरव लालवानी अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावं होती. सासवड कापूरहोळ रस्त्यावर पहाटे हा अपघात झाला होता. भरधाव वेगाने असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुकानाला जाऊन धडकली आणि पलटी झाली होती. या अपघातात जखमींमध्ये तीन मुलींचा समावेश होता. अपघातानंतर गावकऱ्यांनी मदत करुन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोन जणांना मृत घोषित केलं तर पाच जणांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. अपघात झालेले विद्यार्थी हे पुण्यातील एमआयटी कॉलेजचे होते आणि ते विविध विभागात शिकत होते. 


पुणे शहर अपघाताचं प्रमाण वाढलं
पुणे शहरातील आजूबाजूच्या शहरात अपघाताच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. महिन्याभरात किमान सात ते आठ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. वाहतूक कोंडी, वाहनांच्या वेगावर नसलेलं नियंत्रण, रस्त्यांवरील खड्डे, तरुणांची हुल्लडबाजी ही या अपघाताची कारणं असल्याचं समोर आलं आहे.