पुणे: पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या (CoA) मेसमध्ये वॉटर कुलरमधून पाणी पिताना लागलेल्या भीषण इलेक्ट्रिक शॉकमुळे एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून मृत्यूशी झुंज (Pune Accident News) देणाऱ्या या तरुण विद्यार्थ्याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासकीय सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चैतन्य पुंडलिक चव्हाण (२३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असून, पुण्यातील कृषी महाविद्यालयात 'एमबीए' (Agri-Business Management) च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. चैतन्यचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. (Pune Accident News)

नेमकी घटना काय?

१४ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर चैतन्य पाणी पिण्यासाठी वॉटर कुलरपाशी गेला होता. त्याचा मित्र अक्षय सूर्यवंशी याने दिलेल्या माहितीनुसार, वॉटर कुलर नीट थंड होत नसल्याने चैतन्यने त्याची पिन पुन्हा सॉकेटमध्ये लावली. मात्र, नळाला स्पर्श करताच त्याला जोरदार शॉक लागला आणि तो तिथेच चिकटला. मागून मदतीला धावलेल्या मुलालाही काही करता आले नाही. अखेर वीजपुरवठा खंडित केल्यानंतर तो खाली कोसळला आणि शुद्ध हरपली.(Pune Accident News)

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसमध्ये चपला घालून जाण्यास सक्त मनाई आहे. अनवाणी पायाने पाणी पिण्यास गेलेल्या चैतन्यला चपला नसल्यामुळे शॉकचा फटका अधिक तीव्रतेने बसला, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Pune Accident News)

14 मार्चला चैतन्यला मेस मधील वॉटर प्युरिफायर चा शॉक लागला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला. चैतन्य हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातला विद्यार्थी आहे. त्याचे आई-वडील शेतकरी आहे. कृषी महाविद्यालयात ABM च्या म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे.(Pune Accident News)

प्रशासकीय भूमिका आणि चौकशी

या घटनेनंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (राहुरी) कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले की, सर्व कृषी महाविद्यालयांचे 'सेफ्टी ऑडिट' (विद्युत, अग्नी आणि स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली असून, याप्रकरणी कोणाची जबाबदारी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.चैतन्यला वाचवण्यासाठी जहांगीर रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शॉकमुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा (Hypoxic brain insult) झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली.