Pune Bypoll election : चिंचवड विधानसभा  (bypoll election) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सगळीकडे काटेकोरपणे नजर ठेवण्यात येत आहे. त्यात चिंचवडच्या (chinchwad bypoll election) दळवी नगरमध्ये 43 लाख रुपयांची रोकड (Cash) मिळाली आहे. ही रोकड नेमकी कशासाठी वापरली जाणार होती? किंवा कोणासाठी वापरली जाणार होती. हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र चालकाकडून चौकशीत समाधान कारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांना बोलवत कारवाई करण्यात आली आहे.


पुण्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे शहरात कोणतेही अवैध कार्य होऊ नये यासाठी खबरदारी बाळगली जात आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. एवढंच नाही तर गाडीमध्ये धारदार हत्यारे सापडली असून कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.


चालकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कारवाई


चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये त्यांना 43 लाख रुपयांचं घबाड हाती लागलं. यावेळी त्यांनी चालकाची चौकशी केली. विचारपूस केली मात्र या 43 लाख रुपयांसंदर्भात चालकाने दिलेले उत्तर पोलिसांना आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सामाधानकारक न वाटल्याने ही कारवाई केली आहे.


पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाडाझडती


पुण्यात पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे शहरात दोन्ही मतदारसंघात झाडाझडती घेतली जात आहे. त्यातच अनेक परिसराची पाहणीदेखील केली जात आहे. हीच झाडाझडती सुरु असताना हे 43 लाखांचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे.


तक्रार करण्यासाठी नागरिकांना अॅपची सुविधा


येत्या 26 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदारसंघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे अवैध बाबींवर तक्रार आणि कारवाई करणं सोपं होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.