Priya Bapat Umesh Kamat New Marathi Drama Jar Tarchi Goshta : अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामतची (Umesh Kamat) जोडी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. या 'क्युट कपल'चा मोठा चाहतावर्ग आहे. नाटक, मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजच्या माध्यमातून दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. 'नवा गडी नवं राज्य' सारखं नाटक, 'टाईम प्लीज'सारखा रोमँटिक सिनेमा असो वा 'आणि काय हवं' सारखी वेबसीरिज असो. प्रिया आणि उमेशच्या जोडीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
प्रिया आणि उमेशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पण 'जर तर ची गोष्ट' (Jar Tarchi Goshta) या नाटकाच्या माध्यमातून त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. प्रिया आणि उमेशने नुकतीच त्यांच्या या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. या नाटकाच्या माध्यमातून प्रिया-उमेश 10 वर्षांनी रंगभूमीवर एकत्र काम करणार आहे.
'जर तर ची गोष्ट' या नाटकासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उमेश कामत म्हणाला,"जर तर ची गोष्ट' या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रियासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. 'दादा एक गूड न्यूज' आहे या नाटकादरम्यान प्रेक्षकांनी अनेकदा आम्हाला एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. आमची रिअल लाईफमधली केमिस्ट्री रंगभूमीवर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे".
उमेश म्हणाला,"दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाप्रमाणेच 'जर तर ची गोष्ट' हे नाटकही तरुण मंडळींना नाटक पाहायला शिकवेल. आयुष्यात पहिल्यांदा 'दादा एक गुड न्यूज आहे'च्या माध्यमातून नाटक पाहणारे आहेत. तरुणांना आपलं वाटेल पण त्यासोबत मोठ्यांनाही विचार करायला भाग पाडणारं 'जर तर ची गोष्ट' हे नाटक आहे. एकंदरीतच सर्व वयोगटातील मंडळींचा विचार करुन या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे".
'जर तर ची गोष्ट' या नाटकाबद्दल बोलताना उमेश म्हणाला,"जर तर ची गोष्ट' हे नाटक आजच्या तरुणांचं आहे. त्यांचे विचार, रिलेशनशिपकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारं आजच्या तरुणांना रिप्रेझेंट करणारं हे नाटक आहे".
उमेश कामत रंगभूमीशी का जोडला गेलाय?
उमेश कामत म्हणाला,"प्रयोग सुरू असताना आणि प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळणारी दाद याने एका कलाकाराला खूप काही मिळतं. माझ्या प्रत्येक नाटकाने 300 प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. चांगलं नाटक करताना प्रेक्षकांसमोर लाईव्ह परफॉर्म करताना आणि त्यांची लाईव्ह दाद मिळतानाचा आनंद एक वेगळाच आहे. प्रेक्षक त्यांच्या आयुष्यातील चार तास आपल्यासाठी देणं ही एक कौतुकाची थाप आहे. नाटक हे माध्यम चॅलेंजिंग आहे. याच सर्व गोष्टींमुळे मी रंगभूमीशी जोडलेलो आहे".
'जर तर ची गोष्ट'बद्दल जाणून घ्या...
'जर तर ची गोष्ट' या नाटकात प्रिया बापट आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत आहेत. तर आशुतोष गोखले आणि पल्लवी अजयदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इरावती कर्णिक यांनी लिहिलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी सांभाळली आहे.
संबंधित बातम्या