नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन धक्के बसले आहेत.

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचा निकाल (Election Results) आज जाहीर झाला असून अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना, नेत्यांच्या नातेवाईक व कुटुंबीयांना पराभव धक्का बसला आहे. त्यामुळे, जनतेनं आपला कौल देताना नेतेमंडळींनाही धडा शिकवल्याचं दिसून येत आहे. सोलापूर, परभणी, सातारा, सांगली, लातूरसह विविध जिल्ह्यातील आमदार, खासदार व नेतेमंडळींच्या नातेवाईकांना पराभव स्वीकारावा लागल्याने नेत्यांची नाचक्की झाली. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपल्या 5 नातेवाईकांना जिल्हा परिषद निवडणुकांच्या मैदानात उतरवलं होतं. मात्र, 5 पैकी 4 जणांचा पराभव पत्कारावा लागला असून त्यांचा एक पुतण्यात काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर विजयी झाला आहे. तर, मंत्री जयकुमार गोरेंच्या घरातील सदस्यांचा पराभव झाला आहे.
भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन धक्के बसले आहेत. जयकुमार यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झाला, येथे राष्ट्रवादीचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. तर औंध गटात देखील मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झाला, येथे राष्ट्रवादीच्या मनिषा फडतरे विजयी झाल्या आहेत.
भाजप नेते तथा माजी आमदार त्र्यंबक भिसे यांना हा मोठा धक्का बसला असून लातूर जिल्ह्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या आशाताई भिसे यांचा विजय झाला आहे. येथे भाजपाच्या सरिता भिसे यांचा पराभव झाला असून सरिता भिसे माजी आमदार त्रिंबक भिसे यांच्या भावजय आहेत. लातूर ग्रामीणचे माजी आमदार असलेल्या त्र्यंबक भिसेंनी काही दिवसापूर्वीच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता.
माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव झाला असून शिवसेनेच्या 22 वर्षांच्या मृणाल महेश पाटील यांनी त्यांचा पराभव केला. जिल्ह्यातील सर्वात लहान जिल्हा परिषद सदस्य मृणाल महेश पाटील विजयी झाल्या आहेत. मंत्री शंभूराजे यांना आपला गड राखण्यात यश आलं.
लातूर जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्येला पराभव पत्कारावा लागला आहे. रोहिना जिल्हा परिषद गटातून सुप्रिया शृंगारे पायाळ यांचा पराभव झाला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा कांबळे यांचा विजय झाला आहे.
माजी आमदार दिनकर माने यांनाही निवडणूक निकालात धक्का बसला असून सदिच्छा विनोद माने भाजप यांचा पराभव झाला आहे. आशिव जिल्हा परिषद गटातून त्यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या वनिता माने यांनी 595 मतांनी त्यांचा पराभव केला. काही दिवसापूर्वी शिवसेनेतून भाजपात पक्षप्रवेश केलेले दिनकर माने यांना हा मोठा झटका आहे.
सुरेश वरपूडकर यांची कन्या सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून मशालीच्या चिन्हावर उभ्या होत्या. मात्र, सोनल वरपूडकर यांना पराभव पत्कारावा लागला आहे, भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी त्यांचा पराभव केलाय. दुसरीकडे त्यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर उभे असलेले पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर वरपूडकर यांचा पराभव केला. दुसरीकडे त्यांच्या सुनबाई प्रेरणा वरपूडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभ्या होत्या, त्या ठिकाणीही काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी त्यांचा पराभव केलाय. त्यामुळे वरपूडकर यांचे घरातील तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत.
मोहोळमध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः उमेदवार असून ते पराभूत झाले आहेत. तर, नरखेड जिल्हा परिषद गटातून उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव झाला आहे.
विजयी नातेवाईक
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सुरज पाटील यांचाही पंचायत समिती निवडणुकीत विजय झाला आहे.
सांगली जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई मोहिनी खोत बागणी जिल्हा परिषदेतून विजयी झाल्या आहेत. तर, आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल आमेर अंभई गटातून जवळपास 3435 हजार मतांनी विजयी झाले आहेत. भाजपच्या त्र्यंबक मारोती गव्हाणे यांचा त्यांनी पराभव केला.
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांचा 980 मतांनी पराभव झाला. माधवी पडळकर या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला पंचायत समितीवर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झाल्या असून शहाजीबापू पाटलांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हापरिषद गटातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी विजयी झाल्या आहेत. तर, चपळगाव पंचायत गणातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी विजयी झाले आहेत. तोळनूर पंचायत गणातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या शीतल सिद्धाराम म्हेत्रे विजयी झाल्या आहेत. सलगर जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा मुलगा शिवराज सिद्धाराम म्हेत्रे हे विजयी झाले आहेत.
उत्तर सोलापूरच्या कोंडी जिल्हा परिषद गटातून माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र डॉ.पृथ्वीराज दिलीप माने विजयी झाले आहेत. बीबी दारफळ जिल्हा परिषद गटातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार विजयी झाले आहेत.
दक्षिण सोलापूरच्या हत्तूर जिल्हा परिषद गटातून माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी रतिकांत पाटील विजयी झाल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्याच्या परंड्यातील शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी विजयी झाली आहे. आलूर पंचायत समिती गणातून 3925 मतांनी आकांक्षा चौगुले यांचा विजय झाला. आकांक्षा चौगुले उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या दावेदार मानल्या जात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आकांक्षा चौगुले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.
धाराशिव जिल्ह्यात समाजवादी पक्षांने खातं उघडलं असून जिल्हा परिषदेसाठी बहीण तर पंचायत समिती गणातून भाऊ विजयी झाला आहे. येथील मंगरूळ जिल्हा परिषद गटातून सीमा माडजे-रोचकरी तर आरळी पंचायत समिती गणातून कृष्णा रोचकरी विजयी झाल्या आहेत. धाराशिव जिल्हा परिषद आणि तुळजापूर पंचायत समितीत समाजवादी पक्षाची एन्ट्री झाली.
दरम्यान, संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांना एक मताने विजय मिळाला. शिंदे गटाचे हनुमंत भोंडवे यांचा त्यांनी पराभव केला. एक मताने निवडून आलेल्या गरड यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. वाळू माफियांच्या आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधात लढलो, जनतेने मी सामान्य असतानाही निवडून दिले, त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया गरड यांनी विजयानंतर दिली.
हेही वाचा

























