पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra modi) भेट घेतली होती. तत्पूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही मोदींची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. मात्र, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या (NCP) इतरही नेत्यांनी हे वृत्त फेटाळले असून पंतप्रधानांना लोकप्रतिनिधी, तसेच खासदार म्हणून जनतेच्या प्रश्नासंदर्भाने भेटल्याचंही स्पष्टीकरण देण्यात आला आहे. आता, युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. तसेच, ते बारामतीत येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सुप्रिया सुळेंची कन्या रेवती आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील रिसेप्शन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी, पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी मोदींची भेट घेतली. त्यामध्ये, युगेंद्र पवार हेही मोदींना भेटल्याचे दिसून आले. आता, युगेंद्र यांनी पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी कदाचित बारामतीमध्ये येतील. शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान शंभर टक्के येतील, असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. यावेळी, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचेही कौतुक केले. मला पण त्यांचा अभिमान वाटतो, ते चांगल्या पद्धतीने काम करीत आले आहेत, असे युगेंद्र यांनी म्हटले. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्तेतील सहभागावरही त्यांनी भाष्य केल. मोदींना राष्ट्रवादीचे खासदार भेटले, तस काही नाही. मी पण पंतप्रधान यांना भेटलो, पंतप्रधान केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत तर देशाचे आहेत, असे स्पष्टीकरण युगेंद्र यांनी दिले. तसेच, कामानिमित्त भेटणं यात गैर काय नाही, सत्तेमधील लोकांना भेटून लोकांची कामे मार्गी लावणे यात गैर काय आहे? असा सवाल देखील त्यांनी विचारला.
दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही
बारामती पोरकी झाली आहे, दादा मोठे नेते होते, पुन्हा तसा दादा होणं शक्य नाही. दादांची नाळ बारामतीकरांशी जोडली गेली होती, आम्ही तसा प्रयत्न करतोय. सत्ता नसताना आम्ही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र सत्तेतील लोकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे, असे म्हणत नाव न घेता युगेंद्र पवारांनी सुनेत्रा पवार यांच्यावरच निशाणा साधल्याचे दिसून आले.
बारामतीत गुन्हेगारी वाढलीय
बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढलीये, दादांचा दरारा होता, मात्र तो दरारा आता राहिलेला नाही. सत्तेत असणाऱ्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे, सरकारी अधिकाऱ्यांना ताकद दिली पाहिजे. दादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. सत्ता नसताना देखील आम्ही लोकांची कामे करीत आहोत. 50 वर्षे लोक आम्हाला साथ देत आले आहेत. त्यामुळे आम्ही काम करत राहू, नगरपालिकेत आमच्या नगरसेविका हा मुद्दा मांडत आहेत. दोन तीन दिवसांत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना भेटून लोकांच्या अडचणी मांडणार आहोत. जर कोणी भ्रष्टाचार करीत असेल तर आम्ही खपवून घेणार नाहीत. बारामतीमध्ये आम्ही हे चालून देणार नाही, त्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही विरोधक म्हणून लढत राहू, असेही युगेंद्र यांनी म्हटले.
