Yugendra Pawar on Ajit Pawar Death: दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) हे 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद (Zilla Parishad) निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामती येथे येत होते. त्यावेळी गोजुबावी गावाजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात अजित पवार, वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण झाले असतानाही चौकशीचा अहवाल अद्याप समोर न आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे.
युगेंद्र पवार म्हणाले की, "अजित दादांना जाऊन सहा महिने होत आहेत. सहा महिने कसे गेले हे कळलेच नाही. पहिल्या दिवसापासून आमच्या सगळ्यांची मागणी आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा पहिल्या महिन्याभरात प्राथमिक अहवाल आला, पण तो आम्हाला पटलेला नाही. त्यात अनेक मुद्दे चुकीचे आहेत."
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आतापर्यंत रिपोर्ट समोर येत नाही
"आज काकांना जाऊन सहा महिने झाले, पण खंत एकाच गोष्टीची आहे की, आत्तापर्यंत सत्य जनतेच्या समोर आलेले नाही. आम्ही सर्वांनी संयम ठेवलेला आहे. आम्ही वाट बघत होतो की, दुसरा रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल. परवा मी बातमी बघत होतो. अहमदाबाद येथे एअर इंडियाची दुर्दैवी घटना घडली. त्यालाही बराच काळ झाला, तरीदेखील आतापर्यंत कुठलीही चौकशी किंवा रिपोर्ट आपल्या सर्वांसमोर आलेला नाही. अजित दादांसारखे इतके मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले. लोकांच्या मनात शंका आहे. लोक बोलूनदेखील दाखवतात, तरीदेखील आतापर्यंत रिपोर्ट समोर येत नाही, याची खंत युगेंद्र पवार यांनी व्यक्त केली.
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: "CCTV अजून आले नाहीत"
युगेंद्र पवार पुढे म्हणाले, "आमची सर्वांची इच्छा आहे की, लवकरात लवकर या दुर्दैवी घटनेची माहिती आमच्या समोर यावी. नक्की त्या दिवशी काय झालं, हे कळावं. साधे सीसीटीव्ही मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाहीत. लवकरात लवकर ही चौकशी झाली पाहिजे. सीआयडी, डीजीसीए सगळेच चौकशी करत असतील, तर कारण समोर यायला इतका वेळ का लागत आहे? हा प्रश्न बारामतीच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे," असे त्यांनी म्हटले.
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय
"आज सहा महिने होऊन गेले. आम्ही देखील संयम ठेवला, पण इतके दिवस होऊन आत्तापर्यंत आपल्यासमोर काहीच आलेले नाही. इतकी मोठी घटना घडलेली असताना देखील व्हीएसआरच्या मालकावर कारवाई होत नाही. आता आमचा सर्वांचा संयम सुटत चालला आहे. बारामतीकरांना आता सर्व उत्तरे पाहिजेत. जे काही चौकशीतून समोर येत असेल, ते तुम्ही आमच्यासमोर मांडले पाहिजे. तपास यंत्रणांना दुसरा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, अशी मागणी त्यांनी केलीय.
Yugendra Pawar: शरद पवार-मोदी भेटीवरही भाष्य
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यातही बैठक झाली. याबाबत विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले, "पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत. स्वतः पंतप्रधान बारामतीत आले होते, तेव्हा ते म्हणाले होते की साहेब हे माझे गुरु आहेत. त्यांच्याकडून मी बरेच शिकलो आहे. आज आपल्या देशात सर्वाधिक अनुभव जर कुणाकडे असेल, तर तो शरद पवार साहेबांकडे आहे, हे पंतप्रधानदेखील मान्य करतात. शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितले आहे की, कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे केलेल्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी ॲक्शन घेतल्याचे पाहायला मिळाले आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
