Eknath Shinde & Yogesh Kadam: योगेश कदमांवर पक्षश्रेष्ठी नाराज, एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी बंगल्यावर दोन तास ताटकळत बसण्याची वेळ
Eknath Shinde & Yogesh Kadam: योगेश कदम यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केला. पुणे पोलिसांनी नकार देऊनही निर्णय बदलला.

Eknath Shinde & Yogesh Kadam: पुण्यातील कुख्यात कुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे गोत्यात आलेले शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांचे राजकीय ग्रह सध्या प्रतिकूल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोपांची राळ उडवून देत आणि राजीनाम्याची मागणी करत योगेश कदम यांना घेरले होते. त्यामुळे योगेश कदम यांची कधी नव्हे इतकी मोठी कोंडी झाली आहे. अशात त्यांचे वडील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचाही बचाव अपुरा पडत असल्याने योगेश कदम मोठ्या संकटात सापडले आहेत. अशातच आता योगेश कदम यांच्यावर त्यांचे पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीमुळे योगेश कदम यांना शुक्रवारी तब्बल दोन तास एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर ताटकळत बसण्याची वेळ आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला दक्षिण मुंबईतील मुक्तागिरी या बंगल्यावर गेले होते. मात्र, गेल्या दोन तासांपासून योगेश कदम याठिकाणी ताटकळत बसले आहेत. एकनाथ शिंदे हे अद्याप बंगल्यातील खालच्या दालनात आलेले नाहीत. त्यामुळे योगेश कदम हे खालच्या दालनातील खुर्चीवर बसून आहेत. योगेश कदम हे गृहखात्याचे राज्यमंत्री असूनही त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ताटकळत बसण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देऊ नये, असा अहवाल दिला होता. तरीही योगेश कदम यांनी त्यांच्या अधिकारात, 'सचिन घायवळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना दररोज मोठ्या रोख रक्कमेचे व्यवहार करावे लागतात', असे सांगत शस्त्र परवाना मंजूर केला होता. मात्र, सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेशचा सख्खा भाऊ असल्याने विरोधकांनी या मुद्द्यावरुन टीकेची प्रचंड झोड उठवली होती. या टीकेचा प्रतिवाद करताना योगेश कदम यांना नाकीनऊ आले होते. न्यायालयाने सचिन घायवळला दोषमुक्त केले होते. त्यामुळे मी सब-कॉन्शिअस माईंडने शस्त्र परवाना मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याचे योगेश कदम यांनी म्हटले. यापेक्षा काही अधिक स्पष्टीकरण किंवा कारणमीमांसा योगेश कदम यांना करता आली नव्हती. त्यांचे वडील रामदास कदम यांनीही आक्रमक शैलीत आपल्या मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी अगोदरच बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे रामदास कदम यांनी मुलासाठी केलेला बचावही तोकडा ठरला होता. या सगळ्यामुळे योगेश कदम यांनी आज एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र, एकनाथ शिंदे हेदेखील योगेश कदम यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे.
योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यामुळे शिवसेनेची प्रतिमा मलीन होत असल्याचा सूर पक्षामध्ये उमटत आहे. सचिन घायवळचा शस्त्र परवाना मंजूर करुन योगेश कदम यांनी विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. कुख्यात गुंडाशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करणे शिवसेनेला अवघड झाले आहे. या सगळ्याची झळ पक्षाच्या प्रतिमेला बसत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे आज योगेश कदम यांना समजही देऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
























