मुंबई: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वेगात वाहू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच ठाकरे गटाला राज्यभरात मोठी गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. मुंबईत पुन्हा ठाकरेंच्या आणखी दोन शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे, मुंबईतील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम काल झालेल्या मातोश्री वरील माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे.
मातोश्रीवरती शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक
शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेते आज ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे काल मातोश्री वरील बैठकीमध्ये माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम तिथे उपस्थित होते. मात्र, आज हे दोन माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील एक माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे काल (बुधवारी) उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती, या बैठकीला हे दोन्ही माजी नगरसेवक उपस्थित होते.
वाईट काळामध्ये आम्ही एकनिष्ठपणे सोबत राहिलो
दरम्यान, आज वर्धापन दिनाच्या दिवशीच शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिल्याचे बोलले जातेय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणारे विधानसभा संघटक यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण सांगताना म्हटलं की गेले अडीच ते तीन वर्ष महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्ही शिवसेना ठाकरे गट या पक्षाचा झेंडा घेऊन विधानसभेला संघटक आणि नगरसेवक म्हणून कार्य प्रामाणिकपणे पार पाडलं. काम करत असताना मधल्या काळात काही संघटनात्मक बदल झाले. ते बदल झाल्यानंतर संघटनेच्या वाईट काळामध्ये आम्ही एकनिष्ठपणे सोबत राहिलो. मात्र, नवीन नेमणूक झाल्यानंतर त्यांनी आमच्या सर्वांचं दमन करायचा प्रयत्न केल्यानंतर ते आमच्या खूप मनाला लागलं. ज्यावेळी गरज होती त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरून झेंडे घेऊन भांडण करत होतो. पक्षासाठी आम्ही नेटाने उभे राहत होतो. पक्षाचं काम करत होतो. विधानसभेला आम्ही सगळ्यांना एकत्रपणे सोबत घेऊन काम केलं. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदार संघ सर्व निवडणुका पार पाडल्या. मात्र, नवीन नेमणूकानंतर आमचं दमन करण्याचा प्रयत्न केला, असंही पुढे नाराज नगरसेवकांनी म्हटले आहे. विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आम्हाला विचारात घेतील असं वाटलं...
आमचा स्थानिक पदाधिकारी यांच्यावर रोष आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पदावर आल्या-आल्या काही शाखाप्रमुखांना काढलं. काही नवीन नियुक्ती केल्या. माझे देखील त्यांनी डीमोशन करून टाकलं. काही गोष्टी मनाला लागल्या होत्या. ज्या शिवसैनिक तुमच्याशी एकनिष्ठ राहून तुमचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना विचारून निर्णय घेतला असता तर आज चित्र वेगळं असतं. काल झालेल्या मातोश्रीवरील बैठकीत मी उपस्थित होतो. माझी अपेक्षा होती, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला बाजूला घेऊन माझ्याशी चर्चा करतील किंवा आम्हाला विचारात घेतील. आम्ही त्यांना या आधी कल्पना दिली होती, अशा पद्धतीने जे दमन करून माझा जो काही अपमान केला जातोय, आपण त्या बाबतीत वरिष्ठांची विचारणा करावी आणि जे काही नाराज शिवसैनिक आहेत, त्यांना आपण जवळ घेऊन बसून बोलून त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी आम्हाला अपेक्षा होती. काल आम्हाला मातोश्रीवर बैठकीच्या नंतर आम्हाला बोलावून बसून चर्चा करून प्रश्न सोडवतील असं वाटलं होतं. परंतु तसं काहीही झालं नाही. त्यामुळे असं वाटलं कदाचित आपली पक्षाला काही गरज असेल असं वाटत नाही, म्हणून आम्ही शेवटी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा हा निर्णय घेतला असे विजेंद्र शिंदे यांनी म्हटलं आहे.
