Aaditya Thackeray: मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या उधळपट्टीचा चांगला चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी घेतलेली स्कॉर्पिओ आता मुंबई महानगरपालिकेतील कारभाऱ्यांना नकोशी झाली असून नव्या करकरीत इनोव्हा क्रिस्टा कारची मागणी करण्यात येत आहे. या मागणीवरून एकच गदारोळ उडाला असून सोशल मीडियामध्ये सुद्धा संतापाची लाट पसरली आहे. सत्ताधाऱ्यांच्या उधळपट्टीवरून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे. सत्तेत बसून 6 महिने झाले नाहीत तर यांचे नखरे सुरू झाल्याचा टोला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. यांच्या नखऱ्यांसाठी मुंबईचा पैसा का वाया घालवला जात आहे? असा सवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेची तिजोरी गेल्या 4 वर्षांत रिकामी केली
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबई महानगरपालिकेची तिजोरी गेल्या 4 वर्षांत रिकामी केलीच, वर आता भाजपच्या महापौर आणि मिंध्यांचे उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष नवीन गाडी, बंगला मागत आहेत. VIP कल्चर तर एक, पण हे नखरे बघा! म्हणे लांबून यावं लागतं, खड्डे आहेत, ट्रॅफिक असतो. लाखो मुंबईकर जी लोकल ट्रेन वापरतात, ती काही भाजपा 12 वर्षांत सुधारू शकलेली नाही, असा टोला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावला.
का हे सगळे 'बेस्ट' बसने येत नाहीत?
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, मेट्रो यांना वापरायच्या नाहीत आणि आपली 'बेस्ट' यांना बंद पाडून खासगी कंत्राटदारांच्या घशात घालायची आहे. का हे सगळे 'बेस्ट' बसने येत नाहीत? ट्रेन्स वापरत नाहीत? असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी उपमहापौर यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उपमहापौरांनी तर कळसच केलाय! दक्षिण मुंबईत एक बंगला द्या अशी काही दिवसांपूर्वी यांची मागणी होती, असं कानावर आलं. मग तुमच्या टोळीच्या बॉसने 4 वर्षांपूर्वी सांगितलं होतं 2 वर्षांत रस्ते खड्डेमुक्त होतील, त्याचं काय झालं? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, यांच्या नखऱ्यांसाठी मुंबईचा पैसा का वाया घालवला जात आहे? वापरू द्या की बेस्ट! मग बरोबर आमच्या काळात जशी परवडणारी बेस्ट सेवा होती, आणि 10 हजारपर्यंत बसेसची संख्या आम्ही वाढवत नेलो होतो तसं होईल, असंही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
