Who is S Keerthana: तामिळनाडूच्या (Tamil Nadu) राजकारणात सध्या एका 29 वर्षीय तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या थलपती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कझघम' (TVK) पक्षातून शिवकाशी विधानसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या एस. कीर्तना (S Keerthana) यांनी आता थेट मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. नव्या सरकारमधील सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
S Keerthana: 70 वर्षांचे पुरुषांचे वर्चस्व मोडले
एस. कीर्तना यांनी शिवकाशी मतदारसंघातून विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे. गेल्या 70 वर्षांपासून या मतदारसंघावर पुरुषांचे वर्चस्व होते, मात्र कीर्तना यांनी पहिल्याच प्रयत्नात हे वर्चस्व मोडीत काढले. त्या शिवकाशीच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाने तामिळनाडूच्या राजकारणात तरुण पिढीचा प्रभाव अधोरेखित झाला आहे.
S Keerthana: राजकीय सल्लागार ते मंत्री
राजकारणात येण्यापूर्वी कीर्तना यांनी राजकीय सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी तामिळनाडूचे दिग्गज नेते एम. के. स्टालिन यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांसाठी धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. उच्चशिक्षित असलेल्या कीर्तना यांना विविध भाषांचे ज्ञान असून त्यांनी सरकारी शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे.
S Keerthana: हिंदी भाषेमुळे राष्ट्रीय स्तरावर चर्चेत
तमिळनाडूमध्ये अनेकदा हिंदी भाषेवरून वाद निर्माण होत असतात, मात्र कीर्तना यांनी याला छेद दिला आहे. त्यांनी राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चक्क हिंदी भाषेत आपली मते मांडली. "भाषा ही अडथळा नसून ती देशाला जोडण्याचे माध्यम आहे. आमच्या पक्षाची आणि विजय यांची विचारसरणी संपूर्ण भारतभर पोहोचावी, हीच माझी इच्छा आहे," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे त्या सोशल मीडियावरही लोकप्रिय झाल्या आहेत.
S Keerthana: युवा पिढीसाठी आदर्श
"राजकारणापासून दूर राहू नका, तर त्यात सक्रिय सहभाग घ्या," असा संदेश कीर्तना सातत्याने तरुणांना देत आहेत. आपल्या पक्षाची ओळख केवळ तामिळनाडू पुरती मर्यादित न राहता ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावी, हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. साधारण कौटुंबिक पार्श्वभूमी ते कॅबिनेट मंत्री हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आणखी वाचा
