Who is Gokul Gite: नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या राजकारणात अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. महायुतीमधील (Mahayuti) बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मध्यस्थीला अखेर यश आले असून, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते (Ganesh Gite) यांनी निवडणुकीतून अधिकृतपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर त्यांचे बंधू गोकुळ गीते (Gokul Gite) हे अचानक 'नॉट रिचेबल' (Not Reachable) झाले असून, ते अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्यासमोरील पेच कायम आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: मुंबईतील 'त्या' बैठकीत काय ठरले?

नाशिकची बंडखोरी रोखण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली. या बैठकीला गिरीश महाजन आणि त्यांचे निकटवर्तीय निलेश बोरा (Nilesh Bora) देखील उपस्थित होते. या बैठकीची माहिती देताना गणेश गीते म्हणाले, "काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली. राज्यात आपली युती आहे आणि युतीचा धर्म आपल्या सर्वांना पाळावा लागेल, असे वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. त्यामुळे मी नाशिक विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेत आहे," अशी माहिती त्यांनी दिली. 

Who is Gokul Gite?: कोण आहेत गोकुळ गीते?

गणेश गीते यांनी माघार घेतली असली, तरी गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे लागले आहे.

- गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे भाऊ आहेत.

- गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे.

- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळले होते.

- गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत, तर सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते.

Ganesh Gite: "आमच्याच पक्षातील लोक त्रास देतात"; गणेश गीतेंचा खळबळजनक आरोप

भावाच्या भूमिकेविषयी बोलताना गणेश गीतेंनी पक्षांतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "गोकुळ फॉर्म भरताना मला विचारून गेला नव्हता. त्याला ठाऊक होते की, ऐनवेळी माझ्यावर दडपण आणले जाईल आणि मला माघार घ्यावी लागेल. गेल्या दीड-दोन वर्षांपासून आम्हाला त्रास देण्याचे काम सुरू आहे. आमच्याच पक्षातील अनेक जण विनाकारण त्रास देतात, खोटे गुन्हे दाखल करतात. हे सर्व गोकुळला माहीत होते, म्हणूनच त्याने आधीच फॉर्म भरून ठेवला होता," असा आरोप गणेश गीते यांनी केलाय.

Nashik Vidhan Parishad Election 2026: सस्पेन्स अद्याप कायम 

गोकुळ गीते सध्या नॉट रिचेबल असले, तरी मी घरी गेल्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांचे बोलणे थेट देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन यांच्याशी करून देईन, असे गणेश गीतेंनी सांगितले. मात्र, गोकुळ गीते माघार घेणार की नाही, याबाबत त्यांनी शाश्वती दिलेली नाही. दरम्यान, महाविकास आघाडी आणि इतर विरोधकांनी गोकुळ गीते यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे जर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले, तर शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी कमालीच्या वाढू शकतात. आता अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत गोकुळ गीते माघार घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधानपरिषदेत घडामोडींना वेग! महाजनांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते घेणार माघार; गोकुळ गीते मात्र निवडणूक लढण्यावर ठाम