Who is Bal Mane: राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी (Vidhan Parishad Election 2026) 18 जून रोजी मतदान होणार आहे. आज निवडणुकीतून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगवान घडामोडी घडत असतानाच, कोकणच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने (Bal Mane) यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात (District Collector Office) दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी कारवाई करत बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

बाळ माने यांनी ऐनवेळी नितेश राणे यांच्यासोबत जात घेतलेल्या माघारीमुळे महाविकास आघाडीची मोठी नाचक्की झाली. या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांच्यावर हकालपट्टीची कडक कारवाई केली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दिली आहे.

Who is Bal Mane?: कोण आहेत बाळ माने?

विधानपरिषद निवडणुकीतील या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण राज्यात 'बाळ माने' हे नाव प्रचंड चर्चेत आले आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे. 

- बाळ माने हे प्रदीर्घ काळ भारतीय जनता पक्षात (BJP) सक्रिय होते. ते कोकणातील भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते मानले जातात.

- 1999 च्या विधानसभा निवडणुकीत बाळ माने हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.

- 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या जागावाटपात त्यांना उमेदवारी मिळणे कठीण झाल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

- ठाकरे गटाने त्यांना रत्नागिरी मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात विधानसभेची उमेदवारी दिली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

- पराभवानंतरही उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मान-सन्मान राखत त्यांना पक्षाचे उपनेते पद दिले होते, तसेच आता थेट विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती.

Bal Mane: अर्ज मागे घेतल्यानंतर काय म्हणाले बाळ माने?

उमदेवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळ माने यांनी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "या निवडणुकीत 1018 मतदार आहेत, तर मविआचे संख्याबळ 200 च्या आसपास आहे. मला निवडणुकीसाठी सूचक म्हणून महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडे सह्यांची गरज होती. मी अनेक वेळा मागणी करून देखील मला सह्या मिळाल्या नाहीत; त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तसेच, निवडणुकीत मोठा घोडेबाजार सुरू असल्याचे माझ्या कानावर आले. घोडेबाजार करून निवडणूक लढवणे कोकणच्या संस्कृतीला धरून नाही, म्हणून मी अर्ज मागे घेतला," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Konkan Vidhan Parishad Election 2026: कोकण विधानपरिषद निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात होते. मात्र, ऐनवेळी बाळ माने यांनीच माघार घेतल्यामुळे आता या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार असून अनिकेत तटकरे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आणखी वाचा 

Konkan Vidhan Parishad Election 2026: उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी...., कोकणात विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेताच बाळ माने काय काय म्हणाले?