पुणे : राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) होणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे विधान परिषदेतून महायुतीकडून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विक्रम काकडे (Vikram Kakade) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) देखील पुणे विधान परिषदेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र सुनील टिंगरेंना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी देखील बोलावून दाखवली. दरम्यान, कुठलीही चर्चा नसताना पुण्यातून उमेदवारी दिल्याने विक्रम काकडे यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. बैठका आणि चर्चांनंतर सुनील टिंगरेंनी माघार घेतली, या सर्व घडामोडींबाबत आता विक्रम काकडे यांनी भाष्य केलं आहे.
Vikram Kakade : जे नाराज होते, त्या सगळ्यांना भेटलो
विक्रम काकडेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अनेक जण इच्छुक होते. एकदा उमेदवार जाहीर झाला की, पक्षांतर्गत नाराजी दूर होते. मी सगळ्यांची कालपासून भेट घेत आहे. जे नाराज होते, त्या सगळ्यांना भेटलो. काल सुनील टिंगरे यांना देखील भेटलो. निवडणूक लागली तर रणनिती कशी असावी याची चर्चा करावी. महाविकास आघाडीने जर माघार नाही घेतली तरी आम्ही तयारी केली आहे. आमच्याकडे मताधिक्य जास्त आहे. जिल्ह्यातील ९५ टक्के मतदार आमच्याकडे आहेत. सगळी मतं मलाच मिळतील. महायुती म्हणून सोबत आहोत. प्रदीप कंद माघार घेतील असा विश्वास आहे. महायुतीची मतं विभागणार नाहीत, असा विश्वास देखील विक्रम काकडेंनी व्यक्त केला आहे.
Vikram Kakade : तर जय पवारांवर कर्ज आहे का? यावर काकडे म्हणाले...
विक्रम काकडेंनी अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना तब्बल 10 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे या चर्चांवरती बोलताना विक्रम काकडे म्हणाले की, मी जिथे राहतो त्याच्या बाजूचा प्लॉट जय पवार यांच्या नावावरती आहे, ती जागा मला हवी होती म्हणून ॲडव्हान्स लोन दिलेलं होतं, असंही काकडेंनी सांगितलं आहे.
कोण आहेत विक्रम काकडे? (Who Is Vikram Kakade)
1) खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव. 2) अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ता. 3) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू. 4) उत्तम बांधकाम व्यावसायिक.5) 4 वर्ष स्टेट शुटींग चॅम्पियन, राष्ट्रीय पातळीवरील संघात देखील सहभाग.6) आंतरराष्ट्रीय पातळीवर इटली, फ्रान्स जर्मनी, थायलंड येथील थाय ओपन स्पर्धेतदेखील सहभाग.
Vikram Kakade Pune Vidhan Parishad Election 2026 : विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विधानपरिषदेची उमेदवारी विक्रम काकडेंना देण्यात आल्यानं पक्षात नाराजी पहायला मिळतेय. ज्या संजय काकडे आणि अनिल भोसलेंबरोबर अजित पवारांच मोठा वाद झाला होता. त्यांच्याच मुलाला आमदारकी देण्यात आल्याने पक्षातील पदाधिकारी नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे महापालिकेतील सत्ता 2017 साली भाजपच्या पारड्यात जाण्यामध्ये संजय काकडे यांचा मोठा वाटा होता. त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या संजय काकडेंनी राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक फोडून भाजपच्या गळाला लावले. जे राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात गेले नाहीत त्यांचा साम, दाम, दंड, भेद वापरुन काकडेंनी पराभव घडवून आणला. दरम्यान, आर्थिक ताकद असल्यामुळे विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली आहे, अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले. आमच्यातला प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, असे अनेक कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यातल्या कोणालाही संधी दिली असती तरी पक्षाला बळकटी मिळाली असती, असेही विलास लांडे म्हणाले.
Vidhan Parishad Election 2026 : 17 पैकी 11 जागांवर भाजपचे उमेदवार
राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. मात्र त्यापूर्वी निवडणूक होऊ घातलेल्या सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय धुरळा उडाल्याचं पहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतलीय. 17 पैकी 11 जागांवर भाजपने उमेदवार दिले. गेल्या निवडणुकीत भाजप 7 जागा लढली होती, यंदा भाजपला चार अधिकच्या जागा मिळाल्यात. आधी जिंकलेल्या जागा सोडून इतर चार जागांवर भाजपचे उमेदवार उभे आहेत. विशेष म्हणजे भाजपला मिळालेल्या या चारही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार होते. गेल्या विधानपरिषदेपेक्षा चार अधिक जागा भाजप यावेळी लढणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI