Vikram Kakade Met Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काकडे (Vikram Kakade) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (MinisterAmit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत काकडे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार ( Padma Vibhushan award) देण्याची विनंती केल्याची माहिती मिळत आहे. नुकतीच पक्षाच्या सर्व आमदारांनी अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याबाबत सह्यांचं पत्र देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. तसेच केंद्राकडे शिफारस करण्याबाबत विनंती देखील केली होती. अशातच आज विक्रम काकडे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केली.
अजित पवार यांच्या राष्ट्रसेवेचा आणि नेतृत्वाचा यथोचित सर्वोच्च गौरव व्हावा
अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला एक नवी दिशा दिली. एक कणखर प्रशासक, अहोरात्र कष्ट करणारे लोकप्रतिनिधी आणि 'अॅक्शन ओरिएंटेड' नेते म्हणून त्यांनी जनमानसावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या महान राष्ट्रसेवेचा आणि नेतृत्वाचा यथोचित सर्वोच्च गौरव म्हणून त्यांना भारत सरकारचा अत्यंत मानाचा 'पद्मविभूषण' (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर व्हावा, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची आणि आम्हा सर्वांची तीव्र भावना आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून प्रत्येक क्षेत्राला न्याय दिला. पायाभूत सुविधा, रस्ते विकास, मेट्रो आणि सिंचन क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारी ठरले.महाराष्ट्रातील सहकार चळवळ मजबूत करण्यात आणि शेतकऱ्यांना संकटकाळात थेट आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली होती.
महाराष्ट्र सरकारलाही लिहलं पत्र
अजितदादांचे अचानक जाणे हे एका युगाचा अंत झाल्यासारखे आहे. अशा या महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमांचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा मरणोत्तर सर्वोच्च सन्मान होणे हे संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे अर्थमंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शेती, सिंचन, रस्ते आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार द्यावा अशी शिफारस महाराष्ट्र शासनाने तातडीने केंद्राकडे पाठवावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. हे विनंती पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्व आमदारांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे.