विजयदादा आणि अजित पवारांमध्ये राजकीय संघर्ष होता का? अजितदादांनी बारामतीला पाणी पळवलं का? धैर्यशील मोहितेंची बेधडक उत्तरं
Dhairyashil Mohite Patil on Ajit Pawar : विजयदादा आणि अजित पवारांमध्ये वाद होता का? अजितदादांनी पाणी पळवलं का? धैर्यशील मोहिते पाटालांची बेधडक उत्तरं

Dhairyashil Mohite Patil on Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांमध्ये पक्षांतर्गत वाद पाहायला मिळाले आहेत. काही वेळेस ते लोकांसमोर उघडपणे येतात, तर काही वेळेस कोणालाही न समजता सुरु असतात. असाच वाद महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये असायचा अशी चर्चा सुरु असते. याबाबत आता माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी उत्तरं दिली आहेत. याशिवाय त्यांनी अजित पवारांनी पाणी पळवलं का? याबाबतही उघडपणे भाष्य केलं. ते LetsUpp Marathi ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अजितदादांचा उपयोग जिल्ह्यातील काही लोकांनी करुन घेतला
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, विजयदादा आणि अजितदादांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिलेला आहे, असा मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काही लोकांनी करुन घेतला. त्याचं उत्तर जिल्ह्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलेलं आहे. जिल्ह्याचं काय नुकसान झालं हे जिल्ह्याने पाहिलेले आहे. जनतेने लोकसभेलाही विधानसभेलाही सडेतोड उत्तर दिलेलं आहे. अजितदादांचा ज्यांनी उपयोग करुन घेतला आणि ऐनवेळेस त्यांनाही सोडून गेले, अशा लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली.
निलंगेकरांनी विजयदादांची तक्रार वसंतदादांकडे केली होती
पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, नीरा व्हॅली ब्रिटिशांनी डिझाईन केलेलं धरण आहे. त्यांचे कालवे झाले त्यांचा विस्तार झाला. 80 च्या दशकात वसंतदादा मुख्यमंत्री होते. निलंगेकर साहेब पाटबंधारे मंत्री होते. त्यावेळी विजयदादांना पहिल्यांदा उपमंत्रिपद मिळालं होतं. तेव्हा इरिगेशन खात्याला कडा म्हटलं जायचं. नीरा देवधरचा प्रोजेक्ट विजयदादांकडे सहीसाठी आला होता. त्यावेळी त्यांनी सही केली नाही, म्हणून निलंगेकर साहेबांनी वसंतदादांकडे तक्रार केली. मग त्यांनी दोघांना बोलावून घेतलं. त्यावेळी वसंतदादांनी विजयदादांना का सही करत नाही? असं विचारलं. विजयदादा म्हणाले, नीरा व्हॅलीमध्ये फलटण, माळशीरस, शिराळा आणि बारामतीचा भाग आहे. यांनी माळशीरस तालुका वगळला असल्याने मी सही केली नाही. वसंतदादांच्या सूचनेनंतर माळशीरसचा समावेश झाला. त्यावर पुढे रामराजे निंबाळकर साहेबांनी काम केलं. त्यानंतर धरणाचं काम सुरु केलं.
अजित पवारांनी पाणी पळवलं का नाही?
अजित पवारांनी पाणी पळवलं का नाही? या प्रश्नावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, त्यांनी काही प्रमाणात पाणी नेलेलं आहे. अजितदादांनी नेलं आहे. परंतु आज ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचे कार्यकर्ते ते मुख्यमंत्री व्हावेत, असं म्हणतात. मग त्यांनी सर्वांना व्यवस्थित वाटावा मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत.
अजित पवार यांनी बारामतीला जास्तीचं पाणी नेलं, असा मुद्दा 2019 मध्ये होता. आता रणजितसिंह नाईक निंबाळकर या मुद्द्यावर गप्प बसलेत. आता गप्प का बसलेत? त्याचं वाटप योग्य पद्धतीने झालं पाहिजे. सर्व नेत्यांनी एकत्रित बसून कोणावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने पाणी वाटप झालं पाहिजे.
मोठ्या लोकांची नावे घेऊन गल्लीत कालवा करायचा, अशी काही लोकांना सवय आहे. स्वत:चं कर्तृत्व झाकण्यासाठी काहीतरी समाजात पसरवतात. कोणता प्रोजेक्ट आणि काम आणलं हे सांगाव. विजयसिंह मोहिते पाटलांनी रेल्वे प्रोजेक्ट नितीन गडकरी साहेबांकडून मंजूर करुन घेतले होते, ते आता पूर्ण होतं आहेत, असा टोलाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी नमूद केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















