मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या (Officers Transfer) करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याच बदल्यांच्या निर्णयावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) गंभीर आरोप केले आहेत. सनदी अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्या असून, मर्जीतील अधिकाऱ्यांचे लाड करण्यात येत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच, सरकारकडून भारतीय प्रशासन सेवेतील पदाकरता पात्र असलेल्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यात येत असून, भारतीय प्रशासकीय सेवा कॅडरच्या पदावर कॅडर नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या झाल्याचा आरोप वडेट्टीवारांकडून करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्या नियुक्तीवर वडेट्टीवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कमाल नागरी जमीन धारणा (युएलसी) घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ने समन्स बजावल्याने ज्यांची चौकशी झाली, असे अधिकारी दिलीप ढोले यांची नुकतीच शासनाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती केली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. या नियुक्त्यांमुळे सरकारकडून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. सरकारकडून महत्वाच्या पदांचे अवमूल्यन केले जात असून, मर्जीतील अधिकाऱ्यांचे सरकार लाड पुरवतंय, अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.
नियम डावलून नियुक्ती
वास्तविक ढोले हे राज्य कर उपायुक्त (वस्तू व सेवाकर) या विभागातील अधिकारी आहेत. ते पद वर्ग-1 दर्जाचे आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असल्याने आस्थापना विषयक सर्व नियम डावलून सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको या भारतीय प्रशासकीय सेवेतील समकक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही ढोले यांची मीरा-भाईंदर महापालिकेतही सर्व नियम डावलून आयुक्तपदी शासनाने नियुक्ती केली होती. भा.प्र.से. कॅडरच्या पदावर भा.प्र.से. सेवेत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्तीमुळे सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
मर्जीतील अधिकाऱ्यावर मेहेरबान
बृहन्मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती केली आहे. वास्तविक शिंदे हे भारतीय प्रशासकीय सेवतील अधिकारी नसून, ते भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. असे असतानाही इतर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना डावलून केवळ राजकीय पाठबळ आहे म्हणून शिंदे यांना एवढ्या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती देणे हे चुकीचे आहे. यामुळे वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये चूकीचा संदेश गेला आहे. अशा नियुक्त्यामुळे काही अधिकाऱ्यांची पदोन्नती होत नाही. त्यामुळे मर्जीतील अधिकाऱ्यावर मेहेरबान होऊन केलेली नियुक्ती सरकारने तात्काळ रद्द करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nitin Gadkari: विदर्भातून 50 हजार कोटींची मत्स्योत्पादन निर्यात शक्य; नितीन गडकरींचे वक्तव्य