Continues below advertisement

Vijay Wadettiwar on Parth Pawar: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) सुपुत्र पार्थ पवारांच्या (Parth Pawar) कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा गंभीर आरोप केलाय. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा केलाय. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मौजा मुंढवा येथील 16.19 हेक्टर जमीन ही महार वतनाची जमीन असून त्याचे कायदेशीर वारस 300 पेक्षा जास्त आहे. 2013 मध्ये गायकवाड यांच्याकडून पॉवर ऑफ अटॉर्नी घेतला होता. विक्री झाली नव्हती, तेजवानी बिल्डरने त्या पॉवर ऑफ ऑटोर्णीचा गैरवापर केला. या जमिनीचा मूळ मालक महार वतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. गायकवाड आणि इतर वारसदारांनी 2013 पासून तेजवानीने आमच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा चुकीचा वापर केला अशी तक्रार वारंवार केली. 2020 मध्ये फेरफार होऊन गायकवाड आणि ढाले यांचे नाव आले. कोणत्याही वारसदाराला जमीन अधिग्रहणाचा मोबदला मिळाला नाही. फक्त या जमिनीचा टॅक्स न भरल्यामुळे ती जमीन सरकार जमा करून घेतली होती. मूळ मालकाला विश्वासात न घेता, जमिनीचा टायटल क्लियर नसताना, तेजवानी बिल्डरने पॉवर ऑफ अटॉर्नीचा वापर करून पार्थ पवार आणि त्यांची भागीदारी असलेल्या कंपनीला विकली. जमिनीचे टायटल क्लियर नसताना, सातबारावर सरकारचा नाव नसताना, या जमिनीची सेल डीड कशी झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Continues below advertisement

Vijay Wadettiwar on Parth Pawar: ईडी, सीबीआय झोपले आहे का?

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, पार्थ पवार आणि त्यांचे सहकाऱ्यांनी जमिनीच्या मालकाला संपर्क साधून विक्रीची मागणी केली होती. तेव्हा वारसदारांनी जमीन आमच्या मालकीची होऊ द्या, मग विक्री व्यवहार करू असे सांगितले होते. त्यामुळे पार्थ पवार आणि त्यांच्या सहकाऱ्याने अशा पद्धतीने जमीन काबीज केली. जमिनीचा हा व्यवहार रद्द झाला पाहिजे. हा 420 चा व्यवहार आहे. ईडी, सीबीआय झोपले आहे का? हे एवढे मोठे प्रकरण असून त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर असा व्यवहार होणे मोठा गुन्हा आहे. कोणी या व्यवहाराला एका दिवसात परवानगी दिली. मुद्रांक शुल्काला माफी दिली. यातून लक्षात येते की किती मोठा गैरव्यवहार सरकारी पातळीवर झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

Vijay Wadettiwar on Parth Pawar: सत्ता टिकवण्यासाठी देवाभाऊ या प्रकरणी दुर्लक्ष करणार का?

उद्योग संचालनालयावरही कारवाई झाली पाहिजे. कारण राफेलच्या स्पीडने या प्रकरणाची फाईल पुढे गेली आहे. मुंढवा परिसरामध्ये अशा पद्धतीच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्यामध्ये या संदर्भातील नियमांचे उल्लंघन केले जाते. लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून पुण्याचे अशा पद्धतीचे 50 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आले आहेत. शासनाचा करोडो रुपयांचा महसूल या पद्धतीने पुण्यात बुडवला गेला आहे. घोटाळा झालेल्या या जमिनीचा आजचा बाजार दर 1800 कोटी आहे. देवा भाऊ यांना माझा प्रश्न आहे, सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही या प्रकरणी दुर्लक्ष करणार का? की यावर कारवाई करणार आहात? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय.

Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा

पुण्यामधील अशा सर्व प्रकरणासाठी SIT किंवा त्यापेक्षा भक्कम समिती स्थापन करून चौकशी केली पाहिजे. पुण्यात अशाच पद्धतीने एक लाख कोटी पेक्षा जास्त रकमेचा घोटाळा समोर येईल. पार्थ पवार तुम्ही कोणत्या नियमांचे पालन केले आहे? कोणत्याच नियमांचे पालन करण्यात आले नाही. सर्व घोटाळेबाजांवर त्वरित कारवाई करून विक्री खत रद्द केला पाहिजे. मूळ मालकांना महार वतनाची जमीन परत केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर पुण्यात जाऊन सर्व जमिनीची माहिती घेऊन आम्ही पुढील भूमिका जाहीर करणार आहे. 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क चोरी झाली आहे. दुसऱ्या बाजूला सरकार म्हणते तिजोरीत खळखळाट आहे, योजनांसाठी पैसा नाही. पुण्यातील अशा पद्धतीचे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असे हल्लाबोल देखील विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

आणखी वाचा 

Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?