Vijay Pandhare On Ajit Pawar Sinchan Scam: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरुन (Sinchan Scam) मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली. मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याच एका अधिकाऱ्याने कबुल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तर त्यावेळी भाजपा-शिवसेनेच्या युतीच्या सरकारने फंडासाठी प्रकल्पाच्या किंमतीत 100 कोटी मागितले त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.  दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपाकडे होतं. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या या आरोपानंतर जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी एबीपी माझाशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत. अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप शंभर टक्के खरे आहेत, असं विजय पांढरेंनी सांगितले. 

Continues below advertisement

छोट्या-मोठ्या भ्रष्टाचाराचा कळस अजित पवारांनीच केला- विजय पांढरे (Maharashtra Sinchan Scam)

अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप शंभर टक्के खरे आहेत. अजित पवार त्यांच्या खात्यातील भ्रष्टाचाराची कबुली देत आहेत. कृष्णा खोरे प्रकल्पाअंतर्गत अनेक मोठमोठ्या उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. त्यामध्ये प्रचंड मोठ-मोठे घोटाळे आहेत. आता हे 100 कोटी रुपयांची माहिती देतायत. मात्र प्रत्यक्षात सगळ्या योजना मिळून हजारो कोटींचा घोटाळा आहे, असा खळबळजनक दावा जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केला आहे. अजित पवार आरोप करत असले, तरी या सगळ्या छोट्या-मोठ्या भ्रष्टाचाराचा कळस अजित पवारांनीच केला आहे. अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळे अधिकाऱ्याचं नाव घेतलं नाही, असा आरोपही विजय पांढरे यांनी केला. सत्ताधारी आणि विरोधक सगळेच एकत्र चोर आहेत.यासंदर्भात मी अनेक पत्र यापुर्वीही सरकारला लिहिलं आहे. अजित पवारांच्या शेजारी बसून भाजप फसलं आणि हा राजकारणाचा भाग आहे. अजित पवारांचा भाजपचा घोटाळा बाहेर काढायचा प्रयत्न सुरू आहे, असंही विजय पांढरे म्हणाले. या विभागाचे अधिकारी मंत्र्यांना स्कीम देतात आणि सांगतात की, ही योजना राबवली की कसे हजारो कोटी तुम्ही कमावू शकतो, असंही विजय पांढरेंनी सांगितले. 

अजित पवारांचा नेमका आरोप काय? (Ajit Pawar On Sinchan Scam)

अजित पवारांनी भाजपवर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला आहे. 1999 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याच त्या अधिकाऱ्याने कबुल केलं. पुढे त्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की, 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते.  मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे 10 कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत 310 कोटी झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता, असा दावा अजित पवारांनी केला आहे. 

Continues below advertisement

पुरंदर उपसा जलसिंचन योजना नेमकी काय? (What exactly purandar irrigation scheme?)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती आणि दौंड या दुष्काळी तालुक्यातील शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी 1993 साली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत मुळा आणि मुठा नदितील चार टी एम सी पाणी पंपांच्या साहाय्याने लिफ्ट करुन पाईप लाईनद्वारे दुष्काळी तालुक्यांना देण्यास मान्यता मिळाली. पुणे जिल्ह्यातील 63 गावातील 25498 हेक्टर शेतीला फायदा होईल असे सांगण्यात आले. अजित पवारांनी केलेल्या दाव्यानुसार 1996 ला या प्रकल्पासाठी युती सरकारने 330 कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र 1999 ला सत्ताबदल झाला आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री बनले. तेव्हा त्यांना या योजनेचा खर्च वाढविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता पार्टी फंडा साठी 100 कोटी तर अधिकाऱ्यांनी 10 कोटी वाढवल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी वेळेवेळी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन आतापर्यंत या प्रकल्पासाठी 393 कोटी खर्च झाला असुन उरलेल्या कामांसाठी आणखी निधीची मागणी करण्यात आली आहे. 2006 पासुन ही योजना कार्यान्वित झाली आहे.

अजित पवारांना 'एबीपी माझा'चे सवाल- (Ajit Pawar On Sinchan Scam)

अजित पवारांनी हे प्रकरण 27 वर्षे लपवून का ठेवले?

ज्या अधिकाऱ्याने ही बाब बोलून दाखवली त्याचे नाव अजित पवार का सांगत नाहीत?

अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यावर मंत्री म्हणून कारवाई का केली नाही?

अजित पवारांनी ही बाब आत्ताच का उघडकीस आणली?

'माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब समोर आल्यास आवश्यक असेल ते खेरीज करीन' अशी मंत्री म्हणून शपथ घेतली असताना हा घोटाळा का लपवला?

संबंधित बातमी:

मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता