Vidyanand Bapat Pune: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत सडेतोड, सुस्पष्ट आणि बिनतोड तार्किक पद्धतीने मांडणी करणारे विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत. विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाबाबत (Noise Pollution) घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अवकाश ढवळून निघाला आहे. त्यामुळे सध्या विद्यानंद बापट कोण आहेत, याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल जागे झाले आहे. विद्यानंद बापट यांनी एका मराठी वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय विचारसरणीबाबत माहिती दिली. विद्यानंद बापट हे 37 वर्षांचे आहेत. त्यांनी अजून लग्न केलेले नाही. त्यांनी कॉमर्स शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते सध्या बीपीओ क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यानंद बापट यांचे मराठी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. तसेच जगभरातील अनेक देशांमधील सरकारी व्यवस्था, राजकीय चळवळी, विचासरणीबाबतचे अनेक संदर्भही विद्यानंद बापट यांना मुखोद्गत आहेत. विद्यानंद बापट यांना एका मुलाखतीत त्यांचा आवडता नेता कोण हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विद्यानंद बापट यांनी अमेरिकन सिनेटर बर्नी सँडर्स यांचे नाव घेतले. (Pune news)
बर्नी सँडर्स गेली 40 ते 50 वर्षे राजकारणात आहेत. ते सुरुवातीला बर्लिंग्टनचे मेअर होते, पुढे ते सिनेटर झाले. बर्नी सँडर्स गेली अनेक वर्षे सातत्याने पुरोगामी राजकीय विचासरणी मांडत आले आहेत. बर्नी सँडर्स हा प्रचंड राजकीय आवाका असणारा नेता आहे. न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांचा राजकारणातील प्रभाव इतका आहे की, डेमोक्रॅट पक्षाच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत बोलताना बर्नीक्रॅट असा उल्लेख केला जातो. तर एलिझाबेथ वॉरेन या अनेक वर्षांपासून ग्राहक चळवळीशी संबंधित आहेत, असे विद्यानंद बापट यांनी सांगितले.
यावेळी विद्यानंद बापट यांना भारतातील आवडता नेता कोण, असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, मी बहुतांश वेळा यू-ट्यूबवर अमेरिकेतील व्हिडीओ पाहतो. मी भारतीय राजकारणातील घडामोडींवर लक्ष ठेवतो. पण आवडता नेता ठरवणे कठीण आहे. भारतातील आणि पाश्चिमात्य देशांतील राजकारणात एक मोठा फरक आहे. पाश्चात्य देशातील राजकारणात जे उजवे आणि डावे गट आहेत, ते वास्तविक आणि आर्थिक मुद्द्यांवर राजकारण करतात. याचा अर्थ तेथील राजकारणी आणि पक्ष हे आर्थिकदृष्ट्या उजवे असतात आणि त्याचे उपप्रमेय म्हणून ते विचारधारेकडे पाहतात. ते कोणताही भेदाभेद मानत नाहीत. भारतात उजवे डावे म्हटलं की, उजवे म्हणजे धर्मवादी डावे म्हणजे जातीवादी, भाषावादी अशी विभागणी केली जाते. फक्त डावे कम्युनिस्ट वर्गवादी राजकारण करतात, त्यातही अनेकांना सॉफ्ट आयडेंटिटीचे राजकारण सुरु केले आहे. या विचारधारांच्या जात आणि धर्माच्या राजकारणातून काही अर्थपूर्ण साध्य होत नाही. मंडल कमंडल या वादातून समताधिष्ठित समाज निर्माण होणार नाही. अमेरिका आणि इंग्लंडमधील लोकशाही आणि राजकारण हे अधिक परिपक्व आहे. भारतात अजून ते प्राथमिक पातळीवर आहे. भारतातील राजकारण हे धर्मवादी, जातवादी, भाषावादी याच मुद्द्यांभोवती फिरत राहते. त्यामुळे यावर बोलण्यात फार अर्थ नाही, असे विद्यानंद बापट यांनी सांगितले.
आणखी वाचा
