मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे बारामतीमधील विमान अपघातात (Plane crash) अकाली निधन झाले. अजित दादांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी टाहो फोडल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार आपल्यात नाहीत,यावर विश्वासच बसत नाही, अशाच प्रतिक्रिया अनेकांच्या येत आहेत. मात्र, पटत नसलं, पचत नसलं तरीही हे सत्य आहे. बारामती (Baramati) विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी आणि दोन पायलटचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृ्त्यूमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताऱ्याचे होते, मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील कळवा परिसरात राहात होते. या दुर्घटनेच्या बातमीनंतर अजित पवारांसमवेतचे त्यांचे विमानातील फोटो व्हायरल झाले आहेत.
अजित पवारांसमवेत विमान दुर्घटनेत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त समजताच विदीप जाधव यांचे कुटुंबीय सकाळीच बारामतीकडे गेले. चाळीत राहणाऱ्या अनेकांनी आज सकाळी विदिप यांना कामावर जाताना बघितले होते, ज्यावेळी टीव्हीवर बातमी आली त्याचवेळी त्यांच्या आईने घरी रडायला सुरुवात केली, त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना समजवले. मात्र, थोड्याच वेळात कळवा पोलीस घरी आले आणि त्यांच्या आई आणि मुलाला बारामतीला घेऊन गेले, त्यांची बायको कालच पनवेल इथे माहेरी गेली होती. विदिप यांना एक मुलगा एक मुलगी, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. पोलिसात असून देखील त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि मदतीचा होता, त्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी शेजारी राहणाऱ्या लोकांनी केली आहे.
2009 च्या बॅचचे पोलीस हवालदार
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव हे 2009 च्या बॅचचे कॉन्स्टेबल होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते परिचित होते. विमान दुर्घटनेतील त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रचार बैठकांसाठी अजित पवार आज बारामतीला जात असताना ही दुर्घटना घडली.
हेही वाचा
अजित पवारांचं विमान चालवणारी पायलट शांभवी पाठक कोण? 1500 तासांचा फ्लाईट अनुभव, वडिल आर्मी ऑफिसर
