Wardha Chandrapur Gadchiroli MLC Election: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेतच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)  गेल्या काही दिवसात अतिशय रंजक अशा घटना घडल्या आणि याची परिणीती म्हणून अखेर काल (4 जून) काँग्रेसचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनी आपली उमेदवारी परत घेतली. मात्र, अग्रवाल यांनी उमेदवारी जरी काल परत घेतली असली तरी यासाठी भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून सुनियोजित पद्धतीने पावलं टाकली होती. याचाच परिणाम अग्रवाल यांच्या उमेदवारी मागे घेण्यामागे दिसून आला. विशेष म्हणजे राज्यात सर्वच ठिकाणी काँग्रेसकडे (Congress) विधान परिषदेत (Vidhan Parishad Election 2026) उमेदवार निवडून येण्यासारखं बहुमत नाही. मात्र चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली विधान परिषदेत काँग्रेसची स्थिती बऱ्यापैकी मजबूत होती. भाजपपेक्षा काँग्रेसकडे फक्त 40 मतं कमी होती आणि मित्रपक्षांच्या जोरावर काँग्रेसला कदाचित बहुमत गाठता देखील आलं असतं.

दरम्यान, अशीसगळीपार्श्वभूमीअसताना मात्र हीच बाब लक्षात घेऊन भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेले भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्यावर या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी टाकली आणि त्यांनी पद्धतशीरपणे उमेदवार निश्चित व्हायच्या आधीच काँग्रेसच्या नगरसेवकांना आपल्या गळाला लावायला सुरुवात केली होती.

Chandrapur News : सगळ्यातआधी विजय वडेट्टीवारांच्याबालेकिल्ल्यालासुरंग! नगरसेवकांना भाजपनंलावलं गळाला

अशातच, काँग्रेसकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता होती, हीच बाब लक्षात घेऊन भांगडीया यांनी सर्वात पहिले विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील सावली, सिंदेवाही आणि प्रभावक्षेत्र असलेल्या नागभीड कुरखेडा, कोरची या भागातील नगरसेवकांना आपल्या गळाला लावले. यामुळे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीच्या उमेदवारीचं कार्ड हळूच वापस घेतलं.

Congress vs BJP : काँग्रेस नगरसेवकांना लक्ष्मी दर्शन, दबक्या आवाजात नगरसेवकांची चर्चा

यानंतर काँग्रेसच्याच काही नेत्यांना हाताशी धरून काँग्रेस नगरसेवकांना लक्ष्मी दर्शन घडवण्यात आलं, याची दबक्या आवाजात नगरसेवकांनी चर्चा देखील सुरू केली. यानंतर भाजपकडून आमच्याकडे काँग्रेसचे 140 नगरसेवक आहेत, अशी हवा तयार करण्यात आली. यानंतरही शैलेश अग्रवाल यांनी उमेदवार म्हणून नामांकन दाखल करण्याचं धारिष्ट दाखवलं आणि आपणच विजयी होऊ, असा आत्मविश्वास जाहीर केला. मात्र नामांकन दाखल केल्यानंतर अग्रवाल जेव्हा काँग्रेस उमेदवारांच्या भेटीसाठी गडचिरोली जिल्ह्यात गेले तेव्हा अनेक ठिकाणी त्यांना नगरसेवक भेटले देखील नाही. काँग्रेसचे नेते भाजपसाठी काम करतात, अशी आधीच सुरू असलेली चर्चा आणि त्यातच गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे नगरसेवक न भेटल्याने अग्रवाल अधिकच व्यथित झाले.

Shailesh Kumar Agrawal : माझ्याकडे पुरावे, मात्र दाखवू कुणाला? वरपासून खालपर्यंत सगळेच तसे

अखेर त्यांनी नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि आपला उमेदवारी अर्ज परत घेतला. मात्र उमेदवारीचा अर्ज परत घेतल्यानंतर अग्रवाल यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर सडकून टीका केली. उमेदवारी परत घेतल्यानंतर आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाचे 5-5 लाख वाटल्याचा शैलेश कुमार अग्रवाल यांनी गंभीर आरोप केला. सोबतच माझ्याकडे पुरावे आहेत, मात्र दाखवू कुणाला? वरपासून खालपर्यंत सगळेच तसे आहेत, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली