Maharashtra Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)

Continues below advertisement

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे 2020 मध्ये विधान परिषद सदस्य झाले. उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी, असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचे म्हटले जाते. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्कंठा आहे. ते रिंगणात राहिले तर निवडणूक बिनविरोध करण्याकडे भाजपचाही कल असेल. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात- (Vidhan Parishad Election 2026)

दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.

Continues below advertisement

विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
  • नीलम गोऱ्हे (शिवसेना)
  • शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
  • अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
  • गोपीचंद पडळकर (भाजप)
  • रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
  • राजेश राठोड (काँग्रेस)
  • प्रवीण दटके (भाजप)
  • रमेश कराड (भाजप)

विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)

  • प्रज्ञा सातव

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
  • मतदानाची तारीख: 12 मे 2026
  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!