Vidhan Parishad Election 2026: राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीमुळे (Vidhan Parishad Election) राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti) जागावाटपाचा मोठा संभ्रम निर्माण झाला असून भाजप आणि शिवसेनेत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काल भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, आज थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील मातब्बर नेत्याने रिंगणात उडी घेतल्याने महायुतीतील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे.

Vidhan Parishad Election 2026: शिंदे गटाकडून विजय करंजकर मैदानात; भाजपमध्ये अंतर्गत चुरस

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाही महायुतीकडून अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी देखील उमेदवारी अर्ज (Nomination Form) घेतल्याने नाशिकच्या जागेचा पेच अधिकच वाढला आहे.

दुसरीकडे, भाजपमध्येच (BJP) अंतर्गत चुरस प्रचंड वाढली आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे दोन अत्यंत निकटवर्तीय आणि खंदे समर्थक या जागेसाठी थेट आमनेसामने ठाकले आहेत. भाजपचे नाशिक शहर उपाध्यक्ष निलेश बोरा (Nilesh Bora) आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते (Ganesh Gite) या दोघांनीही उमेदवारीसाठी (Candidacy) अर्ज घेतले आहेत. याशिवाय भाजपकडून बापू पिंगळे यांनीही अर्ज घेतला आहे.

Vidhan Parishad Election 2026: 'मला वरिष्ठांनी शब्द दिला होता' : गणेश गीते

भाजपचे माजी नगरसेवक गणेश गीते यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल करत या जागेवर थेट दावा ठोकला आहे. अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माझे नेते गिरीश महाजन यांनी या जागेसाठी शब्द दिला होता. त्यामुळेच मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे." गणेश गीते यांच्या या दाव्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे, कारण निलेश बोरा यांनी देखील नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाकडून वसंत गीतेंची एन्ट्री

एकीकडे महायुती आणि भाजपमधील ही रस्सीखेच थांबण्याचे नाव घेत नसताना, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षानेही या निवडणुकीत जोरदार एन्ट्री घेतली आहे. ठाकरे गटाचे मातब्बर नेते वसंत गीते (Vasant Gite) यांनी देखील या जागेसाठी उमेदवारी अर्ज घेतल्याने नाशिकची ही लढाई अत्यंत चुरशीची (Intense) होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

नाशिकच्या जागे संदर्भात सध्या महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर खलबतं आणि चर्चा सुरू आहेत. मात्र, जागा सुटत नसल्याने नाशिकमध्ये अखेर महायुतीमध्ये 'मैत्रीपूर्ण लढत' होणार की काय? अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या सर्व गोंधळात वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

 

आणखी वाचा 

Vidhan Parishad Election 2026: कोकण विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटणार? तटकरे-शिंदेंच्या भेटीनंतर भरत गोगावलेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...