Vidhan Parishad Election 2026: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांची निवडणूक जाहीर करताच महायुतीमध्ये अंतर्गत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेषतः कोकण स्थानिक स्वराज्य संस्था (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्था या दोन जागांवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये उमेदवारीवरून उघड चढाओढ सुरू झाली आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जागांवर हक्क नेमका कोणाचा, यावरून वरिष्ठ पातळीवर मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

Continues below advertisement

Vidhan Parishad Election 2026: कोकणात शिंदेंच्या शिवसेनेचे पारडे जड; तटकरेंच्या पुनर्वसनात खोडा?

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. राजन साळवी यांनी यापुर्वीच या निवडणुकीच्या अनुषंगाने आखणी सुरू केलीय. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, राजन साळवी यांनी या जागेवर थेट दावा ठोकला आहे.

अकोला येथे बोलताना राजन साळवी म्हणाले, "या मतदारसंघात महायुतीत सर्वाधिक मतदार हे आमच्या पक्षाकडे आहेत. त्यामुळे ही जागा परंपरेनुसार आम्हालाच मिळायला हवी आणि हा आमचा नैसर्गिक दावा आहे. यावर आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील." त्यामुळे आता ही जागा नक्की कुणाच्या वाट्याला येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Continues below advertisement

Vidhan Parishad Election 2026: कोकण मतदारसंघातील पक्षनिहाय संख्याबळ (एकूण मतदार: 831)

शिंदे शिवसेना: 236 (जिल्हा परिषद 77 + नगरपरिषद 159)

भारतीय जनता पक्ष : 151 (जिल्हा परिषद 46 + नगरपरिषद 105)

अजित पवार गट (NCP): 63 (जिल्हा परिषद 18 + नगरपरिषद 45)

उद्धव ठाकरे शिवसेना: 55

काँग्रेस: 50

Vidhan Parishad Election 2026: पुण्यात भाजप वि. राष्ट्रवादी सामना

दुसरीकडे, माजी आमदार अनिल भोसले यांची 2022 पासून रिक्त राहिलेली पुण्याची जागा स्वतःकडे राखण्याचे मोठे आव्हान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणात भारतीय जनता पक्षाने या जागेवर आपला आक्रमक हक्क सांगायला सुरुवात केल्याने पुण्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्हे आहेत.

अनिल भोसले जेव्हा निवडून आले होते, तेव्हा अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने पुण्यात दणदणीत विजय मिळवला आहे. या नवीन संख्याबळानुसार भाजप आणि राष्ट्रवादीचे मतदार आता समसमान पातळीवर आले आहेत. अजित पवार यांच्या पश्चात आता राष्ट्रवादीची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर हा जागावाटपाचा पहिलाच मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. जर आज अजित पवार हयात असते, तर कदाचित भाजपने या जागेवर दावा केला नसता, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Vidhan Parishad Election 2026: भाजपमधून कोणाची दावेदारी?

पुणे महापालिकेत दीर्घ अनुभव असलेले आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे गणेश बीडकर हे या जागेसाठी मुख्य दावेदार मानले जात आहेत. नवीन नगरसेवकांवर त्यांची मजबूत पकड आहे. तर दुसरीकडे, माजी आमदार जगदीश मुळीक यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी विधान परिषदेचे आश्वासन देण्यात आले होते, त्यामुळे त्यांनीही पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी साकडे घातले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर योगेश बहल आणि खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. आता पुण्यात नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Vidhan Parishad Election 2026: पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पक्षनिहाय संख्याबळ

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट: 344

भारतीय जनता पक्ष (BJP): 306

शिंदे शिवसेना: 68

काँग्रेस: 19

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट: 17

उद्धव ठाकरे शिवसेना: 11

Vidhan Parishad Election 2026:  कोणत्या ठिकाणी होणार निवडणूक?

1) पुणे 2) अहिल्यानगर 3) ठाणे 4) जळगाव 5) सांगली-सातारा 6) नांदेड 7) यवतमाळ 8) सोलापूर 9) भंडारा-गोंदिया 10) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 11) नाशिक 12) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली 13) अमरावती 14) धाराशिव-लातूर-बीड 15) परभणी-हिंगोली 16) छत्रपती संभाजीनगर-जालना 17) नागपूर (पोटनिवडणूक)

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

आणखी वाचा 

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत