Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेतील (Konkan Vidhan Parishad Election 2026) शिवसेना महाविकास आघाडीचे (शिवसेना ठाकरे गट) उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने (Bal Mane) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोकणमधील विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. महायुतीकडून अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा आता विजय निश्चित झाला आहे. (Konkan Vidhan Parishad Election 2026)
कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी इंटरेस्टिंग ट्विस्ट निर्माण झाला. कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र आता कोकणमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या बाळ माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोकणातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. (Konkan Vidhan Parishad Election 2026)
कोकणात 2 तासांआधी काय घडलं? (Konkan Vidhan Parishad Election 2026)
कोकणात उमेदवारी अर्ज मागे घेताना मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या 2 तासांआधी मंत्री नितेश राणे हे मविआतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते आणि मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.
ऐनवेळी निवडणुकीतून माघार का घेतली?, बाळ माने यांनी सांगितलं कारण- (Bal Mane Vidhan Parishad Election 2026)
महाविकास आघाडी मिळून कोकण विधानपरिषदेचे उमेदवार बाळ माने म्हणून मी अर्ज भरला होता. लोकशाहीत निवडणुका लढवल्या पाहिजे या मताचा मी होतो. मात्र मी या मतदारसंघाचा आढावा घेतला. मतदारांचा आढावा घेतला. यासाठी सूचक म्हणून सह्या घ्याव्या लागतात, यासाठी सह्यांसाठी मी खूप प्रयत्न केला पण मला खूप त्रास झाला. मविआच्या इतर पक्षाच्या नगरसेवकांच्या सह्या मला मिळाल्या नाही. सह्या घेण्यासाठी खूप त्रास झाला. घोडेबाजार झाला आणि मी त्यामुळेच माझा उमेदवारी अर्ज मागे घेतोय, असं बाळ माने म्हणाले. 1 हजार 18 मतदार आहेत आणि मविआकडे बहुमत नाही. त्यामुळे मी माघार घेतली, असंही बाळ माने यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना ठाकरे पक्षातून बाळ माने यांची हकालप्पटी- (Sanjay Raut On Bal Mane)
ऐनवेळी विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली.
कोण आहेत बाळ माने? (Who Is Bal Mane)
बाळ माने हे मूळचे रत्नागिरीचे असून ते भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार होते. बाळ माने सुरुवातीला भाजपमध्ये होते आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जागा न मिळाल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आणि उदय सामंत यांच्याविरुद्ध 2024 मधील विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र उदय सामंत समोर बाळ माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोकणातील पक्षनिहाय संख्याबळ - एकूण 831 (Konkan Vidhan Parishad Election 2026)
- शिवसेना शिंदे गट - 236
- भाजप - 151
- राष्ट्रवादी - 63
- शिवसेना ठाकरे - 55
- काँग्रेस - 50
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
- उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
- अर्ज माघारीची मुदत- 4 जून
- मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
- मतमोजणी- 22 जून
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची पंचाईत- (Vidhan Parishad Election 2026)
ठाणे विधान परिषद निवड़णूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजीत पवार यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर यवतमाळमध्ये मविआचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळेंनी माघार घेतली, मात्र निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी त्यानंतर आज काँग्रेस नेत्यांनी माणिकराव ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक बोलावली. मात्र ज्या अपक्ष उमेदवाराला मविआ पाठिंबा देणार होती, ते सय्यद फारूक यांनीसुद्धा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मविआची मोठी पंचाईत झाली आहे.
