पुणे : राज्यातील विधानपरिषद (Vidhan parishad) निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून 17 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्याने भाजप महायुतीने निवडणुकीपूर्वीच विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामध्ये, राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे विधानपरिषद (Pune) मतदारसंघातील जागाही बिनविरोध झाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे हेही बिनविरोध झाले आहेत. विशेष म्हणजे, येथील मतदारसंघात महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने येथे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. आता, पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे (Vasant more) यांनी या निवडणुकीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीने आम्हाला दोनवेळा दगा दिलाय, असेही वसंत मोरे यांनी म्हटलंय.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेण्याबाबत चर्चा झाली असेल तर ती आमच्यापर्यंत का पोहोचली नाही. आमच्या वरिष्ठांना देखील याबाबत काहीही माहिती नव्हती. राष्ट्रवादीने आम्हाला दोन वेळा दगा दिला, असा आरोपच वसंत मोरे यांनी केला आहे. एकदा महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीने दगा दिला. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि भाजपची यातून छुपी युती होते का? असा सवाल देखील वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. तर, पुण्यात महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडणार का? याबाबतचा निर्णय काँग्रेस घेईल, असेही त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादीकडून विश्वासघाताचा काँग्रेसचाही आरोप
पुण्यात विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विक्रम काकडेंच्या विरोधात उभे राहिलेले सुनील टिंगरे, भाजपचे नेते प्रदीप कंद आणि सरतेशेवटी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पाटील यांनी देखील शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे, विक्रम काकडेंची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर, काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे बुधवारी मुंबईत झालेली दिलीप वळसे पाटील आणि शरद पवारांच्या भेटीनंतर ही माघार घेण्याचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे काँग्रेसने राष्ट्रवादीविरुद्ध संताप व्यक्त केल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनंही या निर्णयाबाबत आम्हाला माहिती नसल्याचं म्हटलं आहे.
150 कोटींचा खर्च, घोडेबाजार झाला- संजय राऊत
संजय राऊत यांनी देखील ट्विट करत विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आहे. "काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले. विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले. महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे. कोकण, छ. संभाजीनगर, पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत," असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
