वसई-विरार : देशभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धूम पाहायला मिळत असून मुंबईसह राज्यभरात गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाप्पांच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे नियोजन करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, वसई-विरार (Vasai virar) महापालिकेतील भाजप नगरसेवकाने केलेल्या मागणीवरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गणेश विसर्जन स्थळांवर मंडप, बॅरिकेडिंग आणि अन्य व्यवस्थांसाठी देण्यात येणाऱ्या कंत्राटांमध्ये गैरहिंदू कंत्राटदारांना काम देऊ नये, अशी मागणी भाजपचे (BJP) गटनेता तथा नगरसेवक अशोक गजानन शेलके यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यामुळे, आता या मागणीवरुन धार्मिक मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवानंतर नवरात्री उत्सव सुरू होणार आहे, त्यासाठी मुंबईसह विविध ठिकाणी गरबा फेस्टीव्हलचं आयोजन केलं जातं. मात्र, या गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश नको, अशी मागणी काही हिंदुत्त्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंत्री नितेश राणे यांनीही ही मागणी लावून धरली आहे. त्यातच, आता वसई-विरार महापालिकेतील भाजप नगरसेवकाने केलेल्या मागणीवरुन पुन्हा धार्मिक मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कंत्राट गैरहिंदूंना देऊ नये - अशोक शेलके
वसई-विरारमधील गणेशोत्सव हा हिंदू समाजाच्या श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि भावनांशी निगडित महत्त्वाचा उत्सव आहे. गणेश विसर्जनावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने विसर्जनस्थळावरील व्यवस्था अत्यंत संवेदनशील असते, असे शेलके यांनी निवेदनात म्हटले आहे. विसर्जनासाठी मंडप, बॅरिकेडिंग व अन्य व्यवस्था उभारण्याचे कंत्राट देताना केवळ आर्थिक बाबींचा विचार न करता कंत्राटदारांची धार्मिक-सांस्कृतिक संवेदनशीलता, सुरक्षा क्षमता तसेच त्यांच्या कामगारांची पार्श्वभूमी तपासण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, विविध राज्यांतून येणाऱ्या तात्पुरत्या कामगारांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्यास भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा शेलके यांनी केला. गणेशोत्सवाच्या धार्मिक भावना, भाविकांची सुरक्षितता आणि शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी हिंदू कंत्राटदारांनाच विसर्जन व्यवस्थेची कंत्राटे देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
