Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्त्यांवर होणाऱ्या नमाज पठणाच्या मुद्द्यावरून एक कडक इशारा दिला आहे. "नमाज पठण करायचे असेल तर ते शिफ्टमध्ये (टप्प्याटप्प्याने) करा. प्रेमाने मानले तर ठीक आहे, नाहीतर आमच्याकडे दुसरा मार्गही उपलब्ध आहे," अशा सडेतोड शब्दांत त्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. राजधानी लखनऊ येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा दाखला दिला. ते म्हणाले, "अनेक लोक मला विचारतात की, उत्तर प्रदेशात खरंच रस्त्यांवर नमाज पठण होत नाही का? मी त्यांना सांगतो की, आमच्या राज्यात रस्त्यावर नमाज अजिबात होत नाही. तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता. रस्ते हे नागरिकांच्या वाहतुकीसाठी आहेत. रस्ते अडवण्याचा आणि लोकांची ये-जा बाधित करण्याचा अधिकार कोणालाच नाही. ज्या धार्मिक जागा निश्चित केल्या आहेत, तिथेच प्रार्थना झाली पाहिजे."

Yogi Adityanath: "जागा कमी असेल तर शिफ्टमध्ये नमाज पठण करा"

धार्मिक स्थळांवर गर्दी होण्याच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुचवले की, "काही लोकांनी मला सांगितले की आमची संख्या जास्त आहे, त्यामुळे रस्त्यावर यावे लागते. त्यावर मी त्यांना सांगितले की, मग तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये नमाज पठण करा. जर तुमच्याकडे पुरेशी जागा नसेल तर तुम्ही संख्या नियंत्रित केली पाहिजे. जर तुम्हाला व्यवस्थेचा भाग म्हणून राहायचे असेल, तर नियम आणि कायद्यांचे पालन करावेच लागेल."

Yogi Adityanath: "कायदा सर्वांसाठी समान"

योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य असून ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू केले जाईल. "नमाज पठण आवश्यक असेल, तर त्याला आमचा विरोध नाही, पण ते रस्त्यावर होणार नाही. रस्ते हे सामान्य नागरिक, रुग्ण, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांसाठी आहेत. आम्ही कोणालाही रस्ते अडवू देणार नाही. सरकारचा नियम सर्वांसाठी एकच आहे." तर,आपल्या भाषणाचा शेवट करताना त्यांनी हुल्लडबाजांना कडक शब्दांत सुनावले. "आम्ही रस्त्यांवर अराजकता पसरवू देणार नाही. प्रेमाने मानले तर उत्तम, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबला जाईल. संवाद साधणे हे आमचे काम आहे. जर कोणी संवादाने मानणार नसेल, तर त्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी. बरेलीमध्ये काही लोकांनी असा प्रयत्न करून पाहिला होता, त्यांना त्यांची ताकद समजली आहे," असे म्हणत त्यांनी उत्तर प्रदेशात कोणत्याही प्रकारची गुंडगिरी सहन केली जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला.

आणखी वाचा 

Rohit Pawar and Amol Mitkari: रोहित पवार म्हणाले, 'अजितदादांविषयी खालच्या पातळीवर ऑडिओ'; अमोल मिटकरींचा थेट इशारा; म्हणाले, 'तो कितीही मोठा असला तरी...'