Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: आज अभिषेक असता तर घोसाळकरांचं घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती, मला विनोद घोसाळकरांचा (Vinod Ghosalkar) अभिमान वाटतोय. पण यावेळी भावनेत अडकू नका, मी तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांच्या विरोधात आलो नाही, तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय, असं विधान ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं होतं. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्या प्रचार कार्यालयात उद्धव ठाकरेंनी भेट दिली होती. त्यावेळी भाजपने घोसाळकरांच्या घरात भांडण लावून फोडाफोडी केली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी आणि अभिषेकने दोघांनी मिळून प्रत्येक निर्णय घेतले होते. अभिषेक असता तर जे काही असेल ते दोघांनी मिळूनच केलं असतं. मला असं वाटतं की, अजूनही अभिषेक माझ्याबरोबरच आहेत. उद्धव ठाकरे अभिषेकचं नाव घेऊन उगाचच प्रचार करत आहेत. निष्ठावंत वैगरे...ते चुकीचं आहे. उगाचचं तुम्ही अभिषेकचं नाव कशाला घेत आहात. माझा नवरा आहे, मी काहीही करु शकते, असं तेजस्वी घोसाळकर एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.
कोण आहे तेजस्वी घोसाळकर? (Who Is Tejasvee Ghosalkar)
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. 15 डिसेंबर 2025 रोजी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली होती.