Uddhav Thackeray Speech in Tiranga Rally: केंद्र सरकारला नमवणाऱ्या देशातील तरुणाईचं मी अभिनंदन करतो. मुंबईत जमलेली ही गर्दी कोणतीही निवडणूक झाल्यानंतरची नाही, तर अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकल्यानंतरची आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. या संघर्षात जातपात, धर्म विसरुन सहभागी व्हा. मी भारतीय आहे, ही जाणीव ठेवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि महायुती सरकारला लक्ष्य केले. (Mumbai Tiranga Rally)
एका झुरळाने हुकूमशहाला नमवले आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. मोदीजी आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून इतर पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना आतातरी म्हणा देशाचं काम करा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन महागाई, घसरणारा रुपया यावर एक शब्द बोलत नाहीत फक्त पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत. राजनाथ सिंह हे देशाचे संरक्षणमंत्री आहेत, पण आता ते धर्मेंद्र प्रधानांचं रक्षण करत होते. आपले खड्डामंत्री माफ करा, रस्तेमंत्री नितीन गडकरी हे इथेनॉलवर बोलत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मला मोदींना सांगायचं आहे की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या. त्यापेक्षा जास्त यातना नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या असतील. निवडणुकांना आणखी दोन-अडीच वर्षे शिल्लक आहेत. पण निवडणुका गेल्या खड्ड्यात, मोदींना मतं चोरता येतील, पण माणसं चोरता येणार नाहीत. ही ठिणगी आता जागती ठेवणं आपल्या सगळ्यांचे काम आहे. देशातील तरुणाईने देशाच्या इतिहासातील सुवर्ण पान लिहले आहे. आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करु नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Raj Thackeray Speech: राज ठाकरे काय म्हणाले?
तुम्ही जे आंदोलन देशभरात पेटवलं आणि त्याला जे यश आलं त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. या देशातील जेन झी सरकारच्या झिंज्या कशा उपटते, हे या आंदोलनातून कळाले, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या 21 तरुणांची नावं वाचून दाखवत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मौन बाळगण्याचे आवाहन केले.
