Uddhav Thackeray: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'सामना' दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध राजकीय घडामोडींवर अत्यंत बेधडक भाष्य केले आहे. पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली असून, यात उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर, 'गद्दारीचा रोग', NEET पेपरफुटी प्रकरण आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
तुम्ही आमदार-खासदार निवडून आणायचे आणि भाजपनं किंवा शिंदे गटाने ते पळवायचे किंवा विकत घ्यायचे, असं त्यांनी एक धोरणच ठरवलेलं दिसतंय, असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "लोक यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. ते आता बोलू लागलेत. तुम्ही फोडून फोडून काय फोडाल. आम्ही निवडून दिलेले आमदार, नगरसेवक, खासदार... पण आम्ही तुम्हालाच बदलून टाकू, उखडून टाकू देशातून या एका निश्चयानं जनता आता रस्त्यावर उतरलीय आणि हे आता घाबरून बिळात गेले," असे त्यांनी म्हटले.
Uddhav Thackeray: मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा देणार आहेत?
विरोधक टीका करतात की, ठाकरेंना त्यांचे खासदार सांभाळता येत नाहीत, असे विचारले असता "तुम्हाला तरी तुमचा कारभार कुठं सांभाळता येतो? आज गृहमंत्री कुठे आहेत? कुठे दिसतायत? महाराष्ट्रातही नाही आणि देशातही नाही. मुला-मुलींवर अत्याचार होतायत. दिल्लीचं गृह खातं आहे कोणाकडे? नीट (NEET) पेपरफुटी हे धर्मेंद्र प्रधान यांचं अपयश मानून आपण त्यांचा राजीनामा (Resignation) मागत असू तर आंदोलक मुलींवरती विचित्र पद्धतीने लाठीमार करणाऱ्या गृहमंत्र्यांचाही राजीनामा मागितला पाहिजे. बरं, नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रात आहे, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा देणार आहेत?," असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
Uddhav Thackeray: विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार रस्त्यावर उतरलाय
राजकारणाला जो गद्दारीचा रोग जडलेला आहे, फार खोलवर तो कॅन्सर वाढत गेलेला आहे, तो कसा संपेल? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "त्यासाठीच तर विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार रस्त्यावर उतरला आहे. देशाला लागलेले सगळे रोग आता संपतील," असे त्यांनी म्हटले.
Uddhav Thackeray: शिवसेनेचं नाव आणि निशाणी एका गद्दाराला दिली
अशा प्रकारच्या राजकारणाची तुम्ही कधी कल्पना केली होती का? याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून तशी कल्पना आली होती. जेव्हा शिवसेना हा पक्ष फोडला, पक्ष चोरला तेव्हापासून... शिवसेनेचं नाव आणि निशाणी एका गद्दाराला दिली. खरं तर निशाणी ही गोठवली पाहिजे आणि नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाच्या प्रमुखाला नाही. ते मानायला मी तयार नाही. हे ऑन रेकॉर्ड बोलतोय. कारण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. ते बदलण्याचा अधिकार देशात कोणालाही नाही आणि मी ते मान्यच करणार नाही. शिवसेना ही शिवसेनाच आहे. दुसरी आहे ती शहासेना आहे. त्याला तुम्ही शहासेना नाव द्या आणि कोणतंही चिन्ह द्या. तोफ द्या, अणुबॉम्ब द्या, राफेलचं विमान द्या. चालेल मला," असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
