Uddhav Thackeray : सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा दावा केल्यानंतर नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यानंतर बुधवारी (दि. 04) सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. बुधवारी शिवसेना ठाकरे गटाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड (Datta Gaikwad) यांना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांचा फोन आला आणि पक्षविरोधी कारवाई केल्याने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.
आता सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चार महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात नाशिक, जळगाव, जालना, रत्नागिरी-कोकणमधून चार उपनेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
ठाकरेंकडून चार महत्त्वाच्या नियुक्त्या
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी चार उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये गुलाबराव वाघ (जळगाव), सचिन घायाळ (जालना-पैठण), दत्ता गायकवाड (नाशिक), आणि सुरेंद्रनाथ (बाळ) माने (रत्नागिरी-कोकण) यांचा समावेश आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. गुलाबराव वाघ यांना उपनेते पदाबरोबरच रावेर (लोकसभा मतदारसंघ) आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद ही अतिरिक्त जबाबदारीही देण्यात आली आहे.
दत्ता गायकवाडांची ताकद वाढली
तर नाशिकमधून ठाकरे गटाचे मातब्बर नेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दत्ता गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. दत्ता गायकवाड हे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. त्यांच्याकडे नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदाचा कार्यभार होता. आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टीनंतर पहिली प्रतिक्रिया
"पक्षातील काही गोष्टींबाबत नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा नाही," अशी भूमिका सुधाकर बडगुजर यांनी घेतली आहे. पक्षाकडून माझ्या हकालपट्टीची कारवाई झाली असली तरी, त्या निर्णयावर मी योग्य वेळी माझं उत्तर देईन, असं त्यांनी म्हटलं. "पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती, पण मी नाशिकबाहेर असल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही. याबाबत मी जिल्हाध्यक्षांना पूर्वसूचना दिली होती. मात्र मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणूनच जर माझ्यावर कारवाई झाली असेल, तर ती गोष्ट निश्चितच चुकीची आहे," असंही बडगुजर यांनी नमूद केलं. "पक्षाने कोणाला ठेवायचं आणि कोणाची हकालपट्टी करायची, हा पूर्णपणे पक्षाचा अधिकार आहे. या निर्णयावर मी सध्या काही बोलणार नाही. मात्र योग्य वेळी माझी भूमिका स्पष्टपणे मांडेन," असं सांगत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत संकेत दिले.
आणखी वाचा