Uddhav Thackeray-Raj Thackeray: आम्ही सातत्याने सांगतोय मुंबईचा (BMC Election 2026) महापौर हा मराठीच होईल. भाजप काय म्हणतेय की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का?, मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत?, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या घालणारा माणून मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंच्या घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रदर्शित झाला. यामध्ये ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. (Raj Thackeray-Uddhav Thackeray)

Continues below advertisement

मुंबईतील प्रदूषणाचा त्रास सर्वांनाच होतोय. त्यात आम्ही मराठी तर आहोतच, पण जे आदळलेले लोंढे आहेत, जे पिढ्यानपिढ्या इथे राहतात, त्यांचेही घसे बसले आहेत. त्यांनाही आजारपण भोगावं लागतंय आणि तरीसुद्धा ते लोक केवळ आमच्याविरोधात भाजपला मतदान करणार असतील, तर त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की, त्यांना वाचवायला भाजपवाले येणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर महाराष्ट्रात राहणारा, मग तो मुस्लिम असो, जैन असो वा मराठी, या सगळ्यांना महाराष्ट्रीय म्हणणे खूप गरजेचे आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक असली पाहिजे, असं महेश मांजरेकर म्हणाले. यावर मला असं वाटतं, महाराष्ट्रीय वगैरे म्हणण्यापेक्षा मराठी हाच खरा भाव आहे. कारण ते मराठीच आहेत, असं राज ठाकरेंनी सांगितले. (Shivsena UBT-MNS Yuti)

आम्ही एकोपा ठेवायला बघतो, पण भाजप मिठाचा खडा टाकण्याचे काम करतो- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray-Raj Thackeray)

आपण सगळे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा ते मराठी, हिंदी, जैन, गुजराती असं बघून येतं का? मी पुनः पुन्हा तेच सांगतो की, कोरोना आला. मुंबईत पाणी तुंबलं किंवा एखादा अपघात झाला, घातपात झाला. 1992 ची दंगल असेल, नंतर झालेले बॉम्बस्पट्ट असतील, नंतरचे अपघात असतील. शिवसैनिक धावून जातो, रक्तदान करतो. ते रक्त तो कोणाला जाणार आहे हे विचारून देत नाही. शिवसेना आणि मनसेच्या शाखांमध्ये अन्य भाषिकसुद्धा येतात ना? मुसलमानही येतात. माझ्या मुलाला अॅडमिशन पाहिजे, कुणाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायचे आहे. कुणाला रक्ताची गरज असते. रक्तदान करायला जेवढे शिवसैनिक आणि मनसेसैनिक उभे राहतात तेवढे हे राज्यकर्त्यांचे जे कोणी भक्त आहेत ते उभे राहतात का? त्यामुळे आम्ही हा एकोपा ठेवायला बघतो आहोत. त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजप करतो आहे. तो मिठाचा खडा टाकणारयाला आता खड्यासारखे बाजूला टाका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईवर कब्जा करण्यापेक्षा तुम्ही अहमदाबादची मुंबई करा ना...आम्हाला आनंद होईल. तुम्ही बडोद्याची मुंबई करा...तुम्ही सुरतची मुंबई करा...आम्हाला आनंदच होईल. हेल्दी कॉम्पिटिशन असू द्या, असं ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही; आता राज-उद्धव ठाकरे म्हणाले...