इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला सर्व घटकपक्ष उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि आम्ही व्हीसीद्वारे सहभागी झालो, उद्धव ठाकरेंनीही काही मुद्दे मांडले.

मुंबई : देशातील विरोधी पक्षांची एकजूट बांधलेल्या इंडिया आघाडीची बैठक आज काँग्रेस अध्यक्षांच्या नेतृत्वात संपन्न झाली. या बैठकीत केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध भूमिका घेत काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असून 5 मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीची माहिती देताना 5 मुद्द्यांवर एकमत झाले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितला. आता, शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनीही इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती दिली. तसेच, आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तीन मुद्दे उपस्थित केल्याचं त्यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला सर्व घटकपक्ष उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि आम्ही व्हीसीद्वारे सहभागी झालो, उद्धव ठाकरेंनीही काही मुद्दे मांडले. महिनोमहिने आपण भेटत नाही, संवाद नसतो असं ते म्हणाले. आपल्यात संवाद राहायला हवा, समन्वय हवा अशी भूमिका इंडिया आघाडीत त्यांनी मांडली. तसेच, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा निवडला पाहिजे, हे तीन मुद्दे उद्धव ठाकरेंनी मांडले. आम्ही बैठकीला पूर्ण वेळ होतो, उद्धव ठाकरे दीड तास बैठकीला उपस्थित होते. आपली भूमिकाही त्यांनी मांडली. मी, अरविंद सावंत, विनायक राऊतही आजच्या बैठकीला होतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.
कॉकरोच जनता पार्टीबद्दलही मत मांडलं
बैठकीत महागाई आणि घोटाळे हे विषय होतेच. ठरलेल्या आराखड्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना पत्र लिहायचे व नीट परीक्षेसह सर्व विषय त्यात मांडणार आहोत. देशाच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाला असून ॲागस्ट महिन्यात पुढील बैठक हैदराबादमध्ये होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आजच्या बैठकीत अनेकांनी कॅाक्रोच पार्टीविषयी मत मांडले, यापेक्षा मोठी आंदोलन कॅाग्रेसने अनेक राज्यांत केली आहेत. पण, मीडियाने ते दाखवले नाही. तरीही रस्त्यावर उतरून आंदोलन करूया असं ठरले.
टीव्हीके भविष्यात इंडिया आघाडीत येईल - राऊत
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांवर केंद्राच खूप दबाव आहे, अशी भूमिका हेमंत सोरेन यांनी मांडली. तामिळनाडूतील टीव्हीके अधिकृत इंडिया आघाडीत नाही, डीएमके समजदार पक्ष आहे. भविष्यात त्यांना आमंत्रण देऊ, आपचे वेगळे राजकारण आहे, असे म्हणत इंडिया आघाडीत नसलेल्या पक्षांबाबतही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदेंवर टीका, बॅनरवरुन भाजपला टोला
दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीत अमित शहांनी मार्गदर्शन करायला पाहिजे होते, कारण त्याचे निर्माते तेच आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच, दिल्लीत काही बॅनर झळकले असून शरद पवारांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याचे ते बॅनर आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, शरद पवारांनी असं वक्तव्य केल्याची माहिती नाही. जुनी वक्तव्ये काढून ती लावत असतील तर भाजप घाबरले आहे. एकनाथ शिंदे यांची अमित शहा भाजपविषयीची जुनी वक्तव्ये काढली तर.. असे म्हणत दिल्लीत लावण्यात आलेल्या बॅनरवरुन संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, हा काही पारदर्शक राजकारणाचा भाग नाही, असेही ते म्हणाले. अब्दुल सत्तार म्हणाले होते की भाजप हे विष आहे, अमित शहांच्या सेनेपर्यंत हे पोहोचलेले दिसत नाही, ते विषात डबकी मारत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















