Uddhav Thackeray On Meenatai Thackeray Statue मुंबई: स्वर्गीय मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला. दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्यापाशी ही घटना घडली आहे. काल (16 सप्टेंबर) रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं म्हणाले. तसेच हा प्रकार करुन महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

सदर प्रकार दोन प्रकारच्या व्यक्ती करु शकतात. त्यामधील पहिलं म्हणजे स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घ्यायला शरम-लाज वाटणाऱ्या लावारिस लोकांनी हे कृत्य केलं असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच दुसरं म्हणजे बिहारमध्ये ज्याप्रकराणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा अपमान झाला, म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला. त्याप्रमाणेच हा सर्व प्रकार करुन महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

आमच्या भावना अधिक तीव्र- उद्धव ठाकरे

आमच्या भावना अधिक तीव्र आहे. आम्ही सगळ्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेतायत, पोलीस म्हणताय आम्ही आरोपींना शोधून काढू...पुढे काय होतं बघू...असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

सर्व सीसीटीव्ही तपासा, 24 तासांत शोधा- राज ठाकरे

सदर घटना घडल्यानंतर आज दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास्थळी जाऊन माहिती घेतली. यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून देखील राज ठाकरेंनी संबंधित घटनेची माहिती घेतली. सीसीटीव्ही चालू आहेत का?, असा राज ठाकरेंनी पोलिसांना प्रश्न विचारला. तसेच सगळे सीसीटीव्ही चेक करा, 24 तासांमध्ये आरोपींना शोधून काढा, असं राज ठाकरे पोलिसांना म्हणाले. 

नेमकं काय घडलं? (What Happened Near Meenatai Statue)

दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ कोणीतरी सकाळच्या सुमारास लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला आहे घटनास्थळी शिवसैनिक जमले आहेत. काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूची साफसफाई करताना दिसून येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणच्या स्थानिक आमदार, खासदार, काही शिवसैनिक परिसरात दाखल झाले. जमलेल्या शिवसैनिकांनी साफसफाई सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. आजूबाजूचा लाल रंग शिवसैनिकांनी पुसून काढला आहे. शिवसैनिकाने आजूबाजूचा लाल रंग पुसत साफसफाई केली.

संबंधित बातमी:

Raj Thackeray On Meenatai Thackeray Statue: सर्व सीसीटीव्ही तपासा, 24 तासांत शोधा...; राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ, पोलिसांना काय म्हणाले?