मुंबई : ठाणे जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात 'मातोश्री'वर बोलावण्यात आलेल्या बैठकीत जोरदार राडा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली. हा प्रकार पाहून उद्धव ठाकरे अत्यंत संतापले आणि त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

Continues below advertisement

ठाण्यातील कळवा आणि कल्याण मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कल्याणमधील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरून हा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Uddhav Thackeray Anger : उद्धव ठाकरेंचा संताप

'मातोश्री'वर दोन गटांत सुरू असलेली खडाजंगीची परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी बैठकीतच तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "देशात अभिजीत दिपकेसारखा एक तरुण आंदोलनाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत आहे आणि तुम्ही इथे पदांसाठी आपापसात कसली भांडणे करताय?" अशा कडक शब्दांत ठाकरेंनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना झापले.

Continues below advertisement

Kalyan Shivsena : कल्याणमधील हकालपट्टीचा मुद्दा ठरला वादाचे कारण

दोन दिवसांपूर्वीच कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आजच्या बैठकीत या हकालपट्टीचा मुद्दा ऐरणीवर आला. जुने पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त केल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद या वादाच्या केंद्रस्थानी होते, असे सूत्रांकडून समजते.

Shivsena Meeting : बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी आमदार विलास पोतनीस यांसारखे पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या वादंगानंतर ठाण्यातील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे काय कठोर पावले उचलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा :