चेन्नई : तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टालिन (Udayanidhi Stalin) यांना अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर (Trisha Krishnan) यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी मंगळवारी (4 ऑगस्ट) पोलिसांनी ताब्यात घेतले. या घडामोडीनंतर मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) महत्त्वपूर्ण निर्णय देत, उदयनिधि यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सरकारी वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीच्या आधारे उच्च न्यायालयाने हा आदेश जारी केला.
कावेरी जलवाटपाच्या मुद्द्यावर बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्यावर टीका केली. त्याचवेळी उदयनिधी यांनी अभिनेत्री त्रिशाचा संदर्भ देत 'पाणी कुठेही पोहोचले नाही तरी चालेल, मात्र तिथे पोहोचले पाहिजे' असे डबल मिनिंग वक्तव्य केलं. त्यानंतर तामिळनाडूतील राजकारण मात्र चांगलंच तापल्याचं चित्र आहे.
Madras High Court : अटकेचा कोणताही उद्देश नाही
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, उदयनिधी स्टालिन यांना अटक करण्याचा किंवा त्यांना न्यायिक कोठडीत (Remand) पाठवण्याचा कोणताही प्लॅन नाही. हे प्रकरण एका महिलेच्या सन्मानाशी जोडलेले असल्याने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणे आवश्यक होते.
Joseph Vijay Trisha Controversy : तंजावूरमध्ये नेऊन चौकशी
सरकारी वकिलांनी पुढे माहिती दिली की, ही घटना तंजावूर (Thanjavur) जिल्ह्यात घडली होती. त्यामुळेच त्यांना तेथे नेऊन या प्रकरणाशी संबंधित चौकशी केली जात आहे. ही केवळ एक चौकशी प्रक्रिया असून अटकेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आश्वासन सरकारी पक्षाने दिले. ही बाजू विचारात घेत मद्रास उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना चौकशी करण्याची मुभा दिली, परंतु ती पूर्ण होताच त्यांना सोडून देण्याचे निर्देश दिले.
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan : नेमकं प्रकरण काय?
तंजावूर येथे कावेरी पाणी प्रश्नावरून आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनादरम्यान उदयनिधी स्टालिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय (Joseph Vijay) यांच्यावर जोरदार निशाणा साधत होते. त्याच वेळी जमावातून कोणीतरी अभिनेत्री त्रिशा (Trisha) यांचे नाव घेतले. त्यावर प्रतिक्रिया देताना उदयनिधि यांनी कथितरीत्या एक अश्लील अन् द्विअर्थी विधान केले. घोषणाबाजीदरम्यान स्टालिन म्हणाले, "पाणी इतर कुठे पोहोचो अथवा न पोहोचो, पण तिथे नक्की पोहोचले पाहिजे." मात्र, त्यानंतर हसत त्यांनी स्पष्ट केले की ते कावेरी नदीच्या पाण्यासंदर्भात बोलत होते.
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात उदयनिधि स्टालिन यांना रिमांडवर पाठवण्याची कोणतीही गरज नाही. त्यामुळे पोलिसांची चौकशी पूर्ण होताच त्यांना त्वरित मुक्त करण्यात यावे.
ही बातमी वाचा:
