मुंबई : नाशिक विधान परिषदेचे शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपच्या बंडखोराने पराभव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महायुतीच्या तीन नेत्यांनी आपला विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी दिली. त्यांचा अप्रत्यक्ष रोख हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे. यावर शिवसेनेचे मंत्री आणि ज्यांच्यावर नाशिकची जबाबदारी होती ते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र दराडेंच्या पराभवामागे कुणाचा हात आहे याचा तपास करू असं उदय सामंत म्हणाले.
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर उमदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी केला. गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी यासाठी गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. तरीही गोकुळ गिते निवडणुकीच्या रिंगणात राहिले आणि प्रचार न करताही ते निवडून आले. शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
Uday Samant On Nashik Result : 'पराभवामध्ये कोण सामील याचा अभ्यास करू'
नाशिकच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, "गोकुळ गिते हे नाशिकमध्ये निवडून आले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. तो नेमका कशामुळे झाला, त्यामध्ये कोण सामील होतं, याचा आम्ही एक अहवाल तयार करू आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवू. आमच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांची गोळाबेरीज कमी पडली. ती कशी कमी पडली याचे विश्लेषण केलं जाणार आहे."
Uday Samant On Gokul Gite : गोकुळ गितेंसाठी विमान पाठवलं का?
गोकुळ गिते यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांना एकनाथ शिंदे यांनी भेटीसाठी बोलावलं असून खास विमान पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, "माझ्यापर्यंत अशी काही माहिती आली नाही. निकाल लागून फक्त एक तास झाला असून एका तासामध्ये एवढ्या घडामोडी घडतील असं वाटत नाही. या गोष्टी वातावरण निर्माण करण्यासाठी केल्या गेल्या असाव्यात. पराभूत झालेले नरेंद्र दराडे हे आमचे अधिकृत उमेदवार होते. त्यांचा पराभव का झाला याची आम्ही कारणं शोधू."
Uday Samant On Vidhan Parishad Election : गिरीश महाजनांनी विश्वासघात केला?
महायुतीतील तीन नेत्यांनी आपला पराभव केला असा आरोप पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, "महायुतीचे ते तीन नेते नेमके कोण हे जाहीर करावं. गिरीश महाजन, दादा भूसे आणि आपण स्वतः नरेंद्र दराडे यांच्यासाठी प्रयत्न केले. आता हा पराभव का झाला याचं विश्लेषण करू."
ही बातमी वाचा:
