Uday Samant on Sanjay Pawar : शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) रवीकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. हर्षल सूर्व यांनी शहर समन्वयक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेनेचे उपनेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. इंगवले यांच्या नियुक्तीवर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पदाचा राजीनामा दिला असला तरी ते उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) शिवसैनिक म्हणून कार्य करत राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Faction) संजय पवार यांना मोठी ऑफर देण्यात आली आहे.
संजय पवार यांना उदय सामंतांची ऑफर
मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे संघटन कौशल्य असून अशा व्यक्तीवर अन्याय करणे आणि अप्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही निघून जा असे सांगणे बरोबर नाही. अजून आमची संजय पवार यांच्याशी चर्चा झालेली नाही. पण, संजय पवार यांच्यासारखी एखादी चांगली व्यक्ती आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीला ते येत असतील तर नक्कीच आम्ही त्यांचे स्वागत करू, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, प्रत्येक वेळी जातात त्यांना जाऊ दे, बाकीच्यांचा अपमान करायचा, त्यांची बदनामी करायची. त्या लोकांना नावं ठेवायची, हाच उद्योग त्यांचा सुरू असतो. म्हणूनच ठाकरे गटातील सर्व मंडळी आज एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेत आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले संजय पवार?
संजय पवार म्हणाले की, जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेतून बाहेर ठेवलं, 36 वर्षे शिवसैनिक म्हणून काम केलं. मी हनुमान म्हणून आयुष्यभर उद्धव ठाकरे यांच्या पायाजवळ कायम राहणार आहे. मी शिंदे गटात जाणार अशी अफवा पसरवण्यात आली. पण मी कुठंही जाणार नाही. तसेच आपण 1990 पासून शिवसैनिक म्हणून पक्षात काम केलंय. गेली 36 वर्षे मी एकनिष्ठपणे काम केलं. मातोश्रीवरून जे आदेश येतील, त्याचे तंतोतंत पालन केलं. पण गेली 10 वर्षे बघितलं तर काही वेगळं घडत गेलं. निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासायला हवी. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक अनेक होते, पण, नियुक्ती करताना उपनेत्याला देखील माहिती नसेल तर काय करायचं. त्यामुळे मी शिवसेना उपनेतेपदाचा मी राजीनामा देत आहे. एक शिवसैनिक म्हणून मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आणखी वाचा