Uday Samant: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुती समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीला (Mahayuti) मोठा हादरा बसला असून, बंडखोरीचे वादळ शमवण्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर, हे दोन्ही नेते आज नाशिकमध्ये दाखल झाले असून निवडणुकीचा सविस्तर आढावा घेत आहेत. मात्र, दुसरीकडे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींवर आता मंत्री उदय सामंत यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली आहे.

Continues below advertisement

उदय सामंत म्हणाले की, नाशिकमध्ये गणेश गीतेंचा अर्ज मागे घेतला आहे. दोन अर्ज शिल्लक आहेत. गोकुळ गीते, प्रसाद हिरे यांचा अर्ज आहे. मी प्रसाद हिरेंशी दोन वेळा बोललो आहे. प्रसाद हिरे यांना दादा भुसे भेटतील. गोकुळ गीतेंशी मी बोललो आहे, त्यांना विनंती केली आहे. गिरीश महाजन हे देखील नाशिकमध्ये आहेत. गिरीश महाजन त्यांची भेट घेतील. मी प्रचंड आशावादी आहे. गोकुळ गीते माघार घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Uday Samant on Gokul Gite: आम्ही दबाव आणत नाही

गोकुळ गीते यांनी मी भाजपचा बंडखोर नाही. माझ्यावर दबाव आणू नका, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले की, आम्ही दबाव आणत नाही. आम्ही सन्मानपूर्वक विनंती केली आहे.  गिरीश महाजन आणि माझ्या विनंतीला ते मान देतील. राजकारणामध्ये समज गैरसमज होत असतात. त्यामुळे योग्य तो निर्णय होईल.  महायुतीला पोषक असा निर्णय होईल. गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा अशीच आमची भूमिका असणार आहे आणि यात कामाला नक्कीच यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. 

Continues below advertisement

Uday Samant on Kunal Darade: कुणाल दराडेंच्या ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण

कुणाल दराडे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केला. याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले की, मला यातील पार्श्वभूमी माहिती नाही. कुणाल दराडे यांनी खुलासा केलेला आहे की, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. अनावधानाने जर गीतेंचा गैरसमज झाला असेल तर कुणाल दराडे दिलगिरी व्यक्त करतील. पण मी कुणाल दराडे यांना विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की, साहेब मी असे काहीही बोललेलो नाही. हे काहीतरी गैरसमजातून झालेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Uday Samant on Bal Mane: बाळ मानेंच्या टीकेचा समाचार 

कोकणातील नेते बाळ माने यांनी "उदय सामंत हे उपमुख्यमंत्री होण्यासाठी विधानपरिषदेत एवढी धडपड करत आहेत," अशी खोचक टीका केली होती. या टीकेचा उदय सामंत यांनी खरपूस समाचार घेतला. "बाळ मानेंना मी पाच वेळा पाडले आहे. मच्छिमार सोसायटीच्या 16 मतांमध्ये देखील मी त्यांना पाडले आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करावी आणि मी त्यावर बोलावे म्हणजे त्यांना राष्ट्रीय नेता बनवण्यासारखे आहे," असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. त्यांच्या कालच्या भूमिकेवर बोलून त्यांना मोठे करण्याची माझी इच्छा नाही, असे म्हणत सामंत यांनी या वादावर पडदा टाकला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल