Thane Mahangarpalika Election 2026 Seat Sharing Formula: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) युतीकडून मुंबईसह ठाण्यातही एकत्र (Shivsena UBT-MNS) लढणार आहेत. ठाकरे बंधूंसह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही एकत्र निवडणुक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या शिवसेना ठाकरे गट, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मात्र या जागावाटपात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील जागा वाटपात उद्धवसेना व मनसेचे पदाधिकारी अवास्तव हस्तक्षेप करू लागल्याची भावना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष व काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत 13 माजी नगरसेवक असतानाही तीन माजी नगरसेवक गाठीशी असलेली उद्धवसेना व एकही माजी नगरसेवक नसलेली मनसे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कळव्यातील जागांवर दावा करीत आहेत. 30 जागांची मागणी करणाऱ्या काँग्रेसला केवळ पाच जागांवर तडजोड करण्याकरिता ठाकरे बंधूंची युती दबाव टाकत आहे.
ठाण्यात जागावाटपाच्या बैठकीत नेमकं काय घडतंय? (Thane Mahangarpalika Election 2026)
आम्ही सांगणार त्याच जागा तुम्हाला मिळतील, अशी भूमिका उद्धवसेना, मनसेच्या नेत्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप संपलेले नाही. ठाण्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असतानाही त्यांनाही समाधानकारक जागा मिळत नसल्याने पक्षात अस्वस्थता आहे. ठाण्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. जागा वाटपावर एकमत झालेले नाही. बुधवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धवसेनेचे राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे शहरप्रमुख रवी मोरे, राष्ट्रवादी (शरद पवार) चे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
ठाकरेंच्या शिवसेनेचा 50 ते 55, तर मनसेचा 32 जागांवर दावा- (Shivsena UBT-MNS)
ठाणे महापालिकेत 131 नगरसेवक असणार, एकूण प्रभागांची संख्या 33 असणार, त्यापैकी 32 प्रभागात 4 नगरसेवक तर फक्त एका प्रभागात 3 नगरसेवक असणार आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने 50 ते 55 जागांवर दावा कायम ठेवला आहे. तर मनसेला 30 ते 32 जागा हव्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कळवा, मुंब्रा आणि राबोडीत जागा हव्या आहेत. मात्र लोकसभेला मुस्लीम मतदारांची साथ लाभलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने राबोडीतील जागेवर दावा केल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने राबोडीतील जागा आपल्याकडेच राखली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने शहरातील काही भागातील जागा मागितल्या. ठाकरे गटाने आणि मनसेने त्यास नकार दिला. काँग्रेसने 25 ते 30 जागांची अपेक्षा केली असताना त्यांना केवळ पाच जागाच दिल्या जातील, असा सूर आहे. यावर काँग्रेसने देखील नाराजी दर्शवली आहे. यानंतर तुम्हाला 10 जागा हव्या असल्यास तुमचे निवडून येणारे उमेदवार दाखवा, त्यांचा सर्व्हे दाखवा मग जागा देऊ, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने घेतली आहे.
राज-उद्धव ठाकरे ठाण्यात भाजपची 'ती' ट्रिक वापरणार? (Raj Thackeray & Uddhav Thackeray)
गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पॅटर्न प्रचलित केला आहे. त्यानुसार भाजपने आपले अनेक उमेदवार मित्रपक्षांच्या चिन्हावर लढवून विजयी केले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाणे महानगरपालिकेतही हाच पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता आहे. ज्याठिकाणी शिवसेना आणि मनसेला एखादी जागा सोडणे शक्य नसेल, पण त्या वॉर्डमध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवाराची ताकद जास्त असेल तर त्याला आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायला सांगितले जाऊ शकते. त्यामुळे ठाण्यात ठाकरे गटाचे काही उमेदवार इंजिनाच्या चिन्हावर आणि मनसेचे काही उमेदवार मशालीच्या चिन्हावर लढू शकतात. ठाण्यात भाजपला रोखण्यासाठी एकत्र येऊन आणि प्रत्येक वॉर्डातील परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे, हे ठाकरे बंधूंच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ठाण्यात ठाकरे बंधूंकडून शक्य त्या सर्व तडजोडी केल्या जाण्याची शक्यता आहे.
