TVK Vijay Tamil Nadu Government Formation Eqution : तामिळनाडूच्या राजकारणात करिश्मा दाखवत सुपरस्टार थलापती विजयने टीव्हीके पक्षाला मोठं यश मिळवून दिलं. 234 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. विजयच्या टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी त्यांना आणखी 10 जागांची गरज आहे. बहुमताचे 118 आमदार सोबत आल्याशिवाय विजय यांना मुख्यमंत्री होता येणार नाही असं कायदा सांगतो. पण यामध्ये एक मेख आहे, ज्यामुळे बहुमताचा 118 आकडा नसतानाही विजय केवळ 108 आमदारांच्या जिवावर मुख्यमंत्री होऊ शकतो. 

Continues below advertisement

काँग्रेसच्या पाच आमदारांनी थलापती विजयला आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचसोबत विजयने व्हीसीके आणि इतर लहान पक्षांकडेही पाठिंबा मागितल्याची माहिती आहे. काँग्रेस सोडून इतर पाच लहान पक्षांकडे एकूण 12 आमदार आहेत. त्यामुळे सध्यातरी विजयला सत्तास्थापनेमध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याचं चित्र आहे. काँग्रेससह इतर लहान पक्षांची सकारात्मक भूमिका लक्षात घेता थलापती विजय मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतो. त्यानंतर त्याला विश्वासदर्शक ठराव सहज जिंकता येईल अशी सध्यातरी परिस्थिती आहे.

Tamil Nadu Politics : 118 आमदार नसतील तर आकडा कसा बदलेल? 

विधानसभेत कुणालाही बहुमत नसेल तर राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात. तामिळनाडूमध्येही तेच होईल. थलापती विजयला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं जाईल. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विजयला विश्वासदर्शक ठराव जिंकावा लागेल. त्यासाठी पहिला मार्ग म्हणजे, बहुमताचा 118 आकडा. तो जर विजयने पार केला तर विजय मुख्यमंत्रिपदी कायम राहू शकतो.

Continues below advertisement

पण जर बहुमताचा 118 आकडा नसेल तर काय? त्यामध्ये विजयने मुसद्दीपणे राजकारण केलं तर हा बहुमताचा आकडा कमी केला जाऊ शकतो. विश्वासदर्शक ठरावावेळी जर विजयने स्टॅलिन यांच्या DMK किंवा AIADMK पक्षाला मॅनेज केलं आणि यापैकी एका पक्षाचे आमदार जर गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा हा कमी होऊ शकतो.  

उदाहरणार्थ, जर स्टॅलिन यांच्या डीएमकेच्या आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थिती लावली तर बहुमताचा आकडा 29 ने कमी होऊ शकतो. 

एकूण सदस्य = 234

डीएमकेचे 59 सदस्य अनुपस्थित राहिले तर मतदान करणारे सदस्य उरतील : 234 - 59 = 175

175 सदस्यांमध्ये बहुमतासाठी गरज असेल : 88

अशा परिस्थितीत विजय यांच्याकडे 108 आणि काँग्रेसचे पाच असे 113 सदस्य असल्यामुळे त्याला सहज बहुमत मिळू शकतं.

Floor Test Equation : संविधान काय सांगतं?

फ्लोअर टेस्ट किंवा विश्वासदर्शक ठरावात बहुमत हे सभागृहाच्या एकूण संख्येवर नाही तर सभागृहात उपस्थित राहणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या संख्येवर ठरतं. भारतीय संविधानातील कलम 189 नुसार (Article 189 of the Constitution of India) सभागृहात उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने निर्णय घेतला जातो. म्हणजेच जर काही सदस्य अनुपस्थित राहिले किंवा त्यांनी मतदानात भाग घेतला नाही, तर प्रभावी बहुमताची रेषा खाली येते.

Tamil Nadu Majority Equation : राजकीय तज्ज्ञांचं मत काय?

राजकीय तज्ज्ञांच्या मते, एखादा पक्ष किंवा त्याचे काही आमदार सरकारला थेट समर्थन न देता अनुपस्थित राहण्याचा पर्याय निवडतात, तेव्हा ती अप्रत्यक्ष मदत मानली जाते. भारतीय राजकारणात हे अनेकदा झालं आहे. अनेक प्रकरणांमध्ये सदस्यांची अनुपस्थिती किंवा वॉकआउटमुळे बहुमताची गणितं बदलली आहेत. म्हणूनच, डीएमकेने मतदानात भाग घेतला नाही तर विजय यांचं 108 हे संख्याबळ बहुमतासाठी पुरेसं ठरू शकतं.

महाराष्ट्रातली 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळीही जर राष्ट्रवादीचे आमदार विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थित राहिले असते तर बहुमतासाठी असलेला 145 हा आकडा कमी झाला असता, आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला असता. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असती.  

देशात असं कधी घडलं? 

1999 Vajpayee Government Confidence Vote : वाजपेयी सरकारचा विश्वासदर्शक ठराव

अटल बिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारवर 1999 मध्ये विश्वासदर्शक ठराव आला होता. त्या वेळी जयललिता यांच्या एआयएडीएमकेने समर्थन काढून घेतलं. मतदानात सरकार एका मताने पराभूत झालं. काही पक्षांच्या अनुपस्थितीमुळे आणि तटस्थ भूमिकेमुळे बहुमताचं गणित शेवटच्या क्षणापर्यंत बदलत राहिलं. हे भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात नाट्यमय फ्लोअर टेस्टपैकी एक मानलं जातं.

Karnataka Floor Test 2018 : कर्नाटकमधील येडियुराप्पा सरकारची केस

2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस आणि JDS पक्षाने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राज्यपालांनी मात्र सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. 

भाजपचे बी एस येडियुराप्पा (B. S. Yediyurappa) मुख्यमंत्री झाले, पण बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागलं. काँग्रेस-जेडीएस आघाडीने संख्याबळ दाखवल्यानंतर आणि काही आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी मतदानापूर्वीच राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस-जेडीएसचं सरकार स्थापन झालं.

Maharashtra Floor Test 2022 : उद्धव ठाकरेंचं सरकार 

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय संकट निर्माण झालं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र शिवसेनेचे अनेक आमदार अनुपस्थित राहण्याची आणि शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता वाढल्याने उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे-भाजप सरकार सत्तेत आलं.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल - एकूण 234

  • TVK (विजय) - 108
  • DMK - 59
  • AIADMK - 47
  • काँग्रेस - 5
  • PMK - 4
  • मुस्लिम लिग - 2
  • कम्युनिस्ट पक्ष - 2
  • VCK - 2
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 2

ही बातमी वाचा: